मणिपुरात पुन्हा हिंसाचार; जिरीबाममध्ये बंडखोरांनी दोन पोलिस चौक्या, ७० घरे जाळल्याने तणावाची स्थिती

वृत्तसंस्था, इम्फाळ : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला असून, जिरीबाम जिल्ह्यात संशयित बंडखोरांनी दोन पोलिस चौक्यांसह ७० घरांची शनिवारी जाळपोळ केली. दरम्यान, नव्या संघर्षानंतर पोलिस अधीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

टेकड्यांच्या भागातून आल्याचा संशय असलेल्या बंडखोरांनी बराक नदीच्या काठावरील छोटोबेकरा येथे असलेली जिरी पोलिस चौकी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पेटवून दिली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेऊन, लामताई खुनोऊ, मोधूपूर या भागात अनेक हल्ले केले, अनेक घरेही जाळली. मात्र, जवळपास ७० घरांची जाळपोळ करण्यात आली, अशी माहिती जिरीबाम जिल्हा मुख्यालयातील अधिकाऱ्याने दिली. हा भाग राज्याची राजधानी इम्फाळपासून सुमारे दोनशे किलोमीटरवर आहे.

दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा मोहिमेला मदत करण्यासाठी मणिपूर पोलिसांची कमांडो तुकडी शनिवारी सकाळी विमानाने इम्फाळहून जिरीबामला पाठवण्यात आली आहे. नव्या हिंसाचारामुळे पोलिस अधीक्षक ए. घनश्याम शर्मा यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयाचे अतिरिक्त संचालक एम. प्रदीप सिंग यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

मणिपूरमधील वांशिक हिंसाचारापासून जिरीबाम हा जिल्हा दीर्घकाळ अलिप्त होता. मात्र, बंडखोरांकडून एकाची हत्या झाल्यानंतर, हिंसाचार उसळल्याने ६ जूनपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील २३९ जणांना गावांतून हलवून जिरी शहरातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात आले आहे. जिरीबाम जिल्ह्यात मैतेई, मुस्लिम, नागा, कुकी आणि बिगर-मणिपुरी समाजाची वस्ती आहे. मणिपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यापासून उसळलेल्या वांशिक हिंसाचारात २०० हून अधिक जणांचे बळी गेले असून, हजारो लोक बेघर झाले आहेत.

Raigad News: मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत, महामार्ग खचण्याची भीती
‘शहराबाहेरील लोक असुरक्षित’

जिरीबाम जिल्ह्यातील लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करावे, अशी विनंती इनर मणिपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अंगोमचा बिमल अकोइजाम यांनी मणिपूर सरकारकडे केली आहे. ‘मी जिरीबाम जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. काही कुमक पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील लोकांना सुरक्षा पुरवली आहे. मात्र, बाहेरच्या भागातील लोकांना सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही,’ असा दावा अकोइजाम यांनी केला.

Source link

imphal violenceinsurgencyjiribam police stationManipur Conflict And Violencemanipur governmentManipur Violence
Comments (0)
Add Comment