‘१,५००हून अधिक विद्यार्थ्यांच्या निकालांचे पुनरावलोकन करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील ही चार सदस्यीय समिती आठवडाभरात आपल्या शिफारशी सादर करेल. या विद्यार्थ्यांच्या निकालात सुधारणा केल्या जाऊ शकतात,’ असे ‘एनटीए’चे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वाढीव गुणांचा परीक्षेच्या पात्रता निकषांवर कोणताही परिणाम झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या निकालांच्या पुनरावलोकनाने प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
नीट परीक्षेच्या सहा केंद्रांवर वेळेचा अपव्यय झाल्याने भरपाईसाठी देण्यात आलेल्या वाढीव गुणांमुळे एकूण गुण वाढले आहेत. याचा अन्य विद्यार्थ्यांच्या संधींवर परिणाम झाला, असा आरोप करत अनेक घटकांकडून फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली जात आहे. मेघालय, हरयाणातील बहादूरगड, छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि बालोद, गुजरातमधील सुरत आणि चंडीगड या केंद्रांवर विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यात आले. ४ जून रोजी नीटचा निकाल जाहीर करण्यात आला. ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. यातील सहा जण हरयाणातील एकाच केंद्रातील आहेत. या वर्षी विक्रमी २४ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
राजकीय पक्षांकडून चौकशीची मागणी
या मुद्द्यावरून राजकीय आरोपही सुरू झाले आहेत. आम आदमी पक्षाने याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर पेपर लीक, भ्रष्टाचार, गैरव्यवहार अनेक परीक्षांचे अविभाज्य भाग बनले आहेत. भारतीय जनता पक्षाने तरुणांची फसवणूक केली आणि त्यांचे भविष्य अंधारात आणले आहे, असा आरोप काँग्रेसने केला. तर या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत न्यायालयाने खोलवर चौकशी करून दोषींना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली.