लोकसभेत बहुमत नसल्यानं भाजपला सत्ता स्थापनेसाठी तेलुगु देसम पक्ष आणि संयुक्त जनता दलाचा टेकू गरजेचा आहे. टिडीपीचे १६, तर जेडीयूचे १२ खासदार आहेत. टिडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्याशी इंडी आघाडीचे नेते संपर्क ठेवून आहोत. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि डेरेक ओब्रायन यांनी मुंबईत येऊन मातोश्री गाठली आणि उद्धव ठाकरेंची गुरुवारी भेट घेतली. बॅनर्जी आणि ओब्रायन शुक्रवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची दिल्लीत भेट घेतली. नितीश आणि नायडू या दोन बाबूंसाठी इंडी आघाडीनं ‘मॅन टू मॅन मार्किंग’ सुरु केलं आहे.
द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव यांच्याकडून नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधला जाईल. नितीश कुमार यांची अखिलेश यादव यांचे दिवंगत वडील मुलायम सिंह यादव यांच्याशी घट्ट मैत्री होती. त्यामुळे यादव हे नितीश यांच्याशी संपर्क ठेवून राहतील. ‘भाजपसोबत गेलेल्या प्रादेशिक पक्षांची वाताहत होते असा अनुभव असल्यानं एनडीए सरकार फार काळ टिकणार नाही, असं इंडिया आघाडीला वाटतं,’ असं सपचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनी सांगितलं. अखिलेश यादव एव्हाना कुमार यांच्याशी बोललेदेखील असते असंही तिवारी म्हणाले. चंद्राबाबू नायडू आणि डीएमके नेते स्टॅलिन यांच्यातही बैठक झालेली आहे. त्यांच्यात चर्चा होत राहतील, असं तिवारी यांनी सांगितलं.
लोकसभेत भाजपच्या ६३ जागा घटल्या आहेत. त्यामुळे भाजपमध्ये सारं काही आलबेल नाही. याची कल्पना नायडू आणि नितीश यांना आहे. त्यामुळे तेदेखील सतर्क आहेत. त्यांनी सगळ्या शक्यता खुल्या ठेवल्या आहेत, अशी माहिती अन्य सुत्रानं दिली.
‘नितीश कुमार इंडी आघाडीत असताना त्यांनी उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी अखिलेश आग्रही होते. इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नितीश यांचं नाव पुढे करण्याचा प्रयत्न अखिलेश यांच्याकडून सुरु होता. पण काँग्रेसनं नितीश यांना इंडी आघाडीचे समन्वयक करण्याबद्दलचा निर्णय काँग्रेसनं घेतला नाही. त्यामुळे ते पुन्हा एनडीएमध्ये गेले. या सगळ्या घडामोडी पाहता काँग्रेस नितीश कुमार यांच्याशी वाटाघाटी करण्याची चर्चा धूसर होते. पण प्रादेशिक पक्ष नितीश यांच्याशी चर्चा करू शकतात,’ असं सुत्रांनी सांगितलं.
२०१९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी अस्तित्त्वात आली. शरद पवार या आघाडीचे शिल्पकार होते. लोकसभा निवडणुकीनंतरचं संख्याबळ पाहता तेदेखील सक्रिय झाले आहेत. सगळ्याच पक्षांमध्ये उत्तम संबंध असलेले पवार योग्य संधीची वाट पाहत आहेत. सध्याच्या घडीला सत्ता स्थापनेची घाई केल्यास तो आतातायीपणा ठरेल याची कल्पना इंडी आघाडीला आहे.
सध्याच्या घडीला जेडीयू आणि टिडीपीचं प्राधान्य भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याला आहे. त्यांनी आपल्या मागण्या भाजपकडे दिलेल्या आहेत. वजनदार मंत्रिपदांसोबतच त्यांना किमान समान कार्यक्रम हवा आहे. अग्निवीर योजना रद्द, जातीनिहाय जनगणना, मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण आणि बिहार, आंध्रप्रदेशला विशेष आर्थिक सहाय्य या टिडीपी, जेडीयूच्या मागण्या आहेत. भाजप नेतृत्त्वानं प्राथमिक मागण्या अमान्य केल्यास इंडी आघाडीसोबत चर्चा करु, असं आश्वासन टिडीपी आणि जेडीयूकडून देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
दोन अपक्ष खासदारांच्या पाठिंब्यासह इंडी आघाडीकडे सध्या २४२ खासदार आहेत. सरकार स्थापनेसाठी आणखी ३० खासदारांचा पाठिंबा गरजेचा असेल. जेडीयू आणि टिडीपी यांचे मिळून २८ खासदार आहेत. याशिवाय शिंदेसेनेचे ४ खासदारही परिस्थिती पाहून निर्णय घेऊ शकतात, असा दावा इंडी आघाडीतील बड्या नेत्यानं केला आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा सत्ता स्थापनेसाठी बरीच घाई करत आहेत. त्यांच्या योजनेला संघाशी एकनिष्ठ असलेले खासदार कसा प्रतिसाद देतात यावरही इंडी आघाडी लक्ष ठेवून आहे.