राज ठाकरे जाहीर सभेत आत्मविश्वासाने बोलले अन् नारायण राणेंसोबत नेमके उलटे घडले

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. राज यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभादेखील घेतल्या. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून भाजपकडून मैदानात असलेल्या नारायण राणेंसाठी राज यांनी कणकवलीत सभा घेतली होती. यावेळी त्यांनी ठाकरेसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका केली. राणेंनी लोकसभा निवडणुकीत बाजी मारली. राऊत पराभूत झाले.

दोन टर्मचे खासदार असलेले विनायक राऊत शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिले. राणेंसाठी घेतलेल्या प्रचारसभेत राज यांनी राऊत यांना लक्ष्य केलं. नुसता बाकावर बसणारा खासदार पाहिजे की केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणचा विकास करणार खासदार पाहिजे, असा सवाल राज यांनी विचारला. राऊत यांना टोला लगावत राज यांनी राणेंचं तोंडभरुन कौतुक केलं.
राष्ट्रवादीला NDA सरकारमध्ये मंत्रिपद नाही? फडणवीस तटकरेंच्या बंगल्यावर, वेगवान घडामोडी सुरु
मोदी सरकार २ मध्ये लघु आणि सूक्ष्म उद्योग असलेले मंत्री नारायण राणे पुढील मंत्रिमंडळातही मंत्री होतील, असा विश्वास राज यांनी त्यांच्या विधानातून व्यक्त केला होता. राणेंच्या मंत्रिपदाचा धागा पकडूनच राज यांनी राऊतांचा उल्लेख बाकावर बसणारा खासदार असा केला. पण आता बहुधा राणे यांनाच नुसतं बाकावर बसावं लागण्याची शक्यता आहे. कारण त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा मावळली आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी राज्यातील सहा खासदारांना फोन आले आहेत. पैकी चार खासदार भाजपचे आहेत. पियूष गोयल, नितीन गडकरी, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. शिंदेसेनेचे खासदार प्रतापराव जाधव आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनादेखील मंत्रिपदासाठी फोन आले आहेत. त्यामुळे राज्याला सहा मंत्रिपदं मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.

Source link

bjpNarayan Ranenda governmentpmoनारायण राणेभाजपमोदी सरकारराज ठाकरे
Comments (0)
Add Comment