बांगलादेशच्या स्थापनेत भारताने केली मदत
भारताने डिसेंबर १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्थापनेत मदत केली होती. त्याचबरोबर बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणारा भारत हा पहिला देश होता. अवामी लीग पक्षाच्या शेख हसीना २००८ पासून बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. जानेवारी २०२४ मध्ये त्यांनी सलग चौथ्यांदा पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली. विजयानंतर शेख हसीना यांनी जगाला भारताला आपला सर्वात चांगला मित्र असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी हे त्यांचे अभिनंदन करणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांपैकी एक होते.
शेख हसीना आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांमधील परस्पर संबंध दृढ झाले आहेत. एप्रिल २०१७ मध्ये दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये संयुक्त सराव आणि प्रशिक्षणाबाबत करार झाला होता. त्यानुसार लष्करी उपकरणे खरेदी करण्यासाठी भारताने बांगलादेशला ४ हजार कोटी रुपये दिले.
भारत-बांगलादेश तेल पाइपलाइनचे काम २०१८ मध्ये सुरू झाले.आणि त्याच वर्षी बांगलादेशने भारताला चितगाव आणि मोंगला बंदर वापरण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर २०१९ मध्ये दहशतवाद आणि तस्करांविरुद्ध गुप्त माहिती सामायिक करण्यावर सहमती झाली
कोरोना महामारीच्या काळात भारताकडून बांगलादेशला मदत
भारताने २०१९ मध्ये कोविड दरम्यान बांगलादेशला लसीचा पुरवठा केला होता. तसेच दुसऱ्या लाटेत बांगलादेशने भारताला औषधांच्या माध्यमातून मदत केली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये कुशियारा नदीचे पाणी वाटपावर करार झाला. पीएम मोदींनी याला मुत्सद्देगिरीचा सुवर्ण अध्याय असं म्हंटलं होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हसीना शेख यांनी मिळून अखौरा-अगरतळा रेल्वे लिंकचे उद्घाटन केले.
असा आहे शेख हसीना यांचा परिचय
शेख हसीना यांचा जन्म २८ सप्टेंबर १९४७ रोजी पूर्व बंगालमधील तुंगीपारा येथे झाला. त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे संस्थापक होते. जन्मानंतर त्यांचे कुटुंब ढाक्याला आले. ढाक्यातूनच शेख मुजीबुर रहमान यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. १९७५ हे वर्ष हसीना शेख यांच्या कुटुंबासाठी शोकांतिकेने भरलेले होते. १५ ऑगस्ट १९७५ रोजी लष्कराच्या एका तुकडीने बंड केले. आणि शेख मुजीब यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची हत्या केली. त्यातून शेख मुजीब यांच्या दोन मुली शेख हसीना व शेख रेहाना या परदेशात असल्यामुळे बचावल्या. आई-वडील आणि भावाच्या हत्येनंतर शेख हसीना काही काळ जर्मनीत राहिल्या. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना भारतात आश्रय दिला. बहिणीसोबत ती दिल्लीला आल्या . आणि सुमारे ६ वर्षे येथे राहून १९८१ मध्ये शेख हसीना मायदेशी परतल्या. आणि अवामी लीगची कमान हाती घेतली. त्यानंतर १९९६ मध्ये त्या पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या. २००८ मध्ये दुसऱ्यांदा सत्ता हाती घेतली. तेव्हापासून आत्तापर्यंत शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान आहेत.