मोदी ३.० मध्ये नड्डा यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. नड्डा २०१२ साली राज्यसभेचे सदस्य होते. २०१४ साली जेव्हा अमित शहा यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्विकारले तेव्हा नड्डा यांना संसदीय बोर्डात घेण्यात आले होते. २०१९ साली अमित शहा गृहमंत्री झाले आणि नड्डा यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले. २०२० साली ते पूर्णवेळ अध्यक्ष झाले.
भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षाचा कार्यकाळ ३ वर्षाचा असतो. कोणत्याही अध्यक्षाला सलग दोन वेळा या पदावर राहता येते. नड्डा यांचा कार्यकाळ आधीच संपला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. आता जून महिन्याच्या अखेरीस भाजप नवा अध्यक्ष निवडेल. याआधी अमित शहा यांनी सलग दोन कार्यकाळ पूर्ण केले होते. त्याआधी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि राजनाथ सिंह यांनी दोन कार्यकाळ पूर्ण केले आहेत.
जेपी नड्डा याआधी मोदी सरकारमध्ये मंत्री होते.तेव्हा त्यांच्याकडे आरोग्य मंत्रालय होते. आता नड्डा पुन्हा मंत्रिमंडळात आले तर त्यांच्या जागी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना अध्यक्ष केले जाऊ शकते. नड्डा यांना मंत्री केले तर सलग पाच वेळा लोकसभा निवडणूक जिंकणारे अनुराग ठाकूर यांना मंत्रिपद दिले जाईल का? की नड्डा आणि ठाकूर या दोघांना मंत्रिमंडळात संधी मिळेल हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागले.
नड्डा आणि ठाकूर हे दोन्ही नेते हिमाचल प्रदेशमधील असून एकाच राज्यात दोन कॅबिनेट मंत्री दिले जाणार का या अर्थाने देखील मोदींच्या मंत्रिमंडळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.