सिंधुदु्र्गात चिपी विमातळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बोलायला सुरुवात केल्यानंत राणे विरुद्ध ठाकरे या वाकयुद्धाची ठिणगी पडली. मी १९९० साली सिंधुदु्र्गात आलो. तेव्हा सिंधुदुर्गचाकाही एक विकास झाला नव्हता, असे सांगत आपल्या प्रयत्नाने जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. त्यामुळे इथला जो विकास झाला त्याचे कारण नारायण राणे हे आहे, दुसऱ्या कोणाचेही नाव येऊ शकणार नाही, असे सांगत राणे यांनी इथल्या विकासाचे श्रेय स्वत:कडे घेतले.
क्लिक करा आणि वाचा- ‘सिंधुदुर्गच्या विकासाचे कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचे नाव येऊ शकत नाही’
राणे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युतर देत राणे यांना जोरदार टोला लगावला. मी एरियल फोटोग्राफी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला पाहिला, असे सांगताना निदान हा सिंधुदुर्ग किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे, कारण कोणीतरी म्हणेल की मीच बांधला, असा जोरदार टोला मुख्यमत्र्यांनी राणे यांना लगावला
असे झाले वाकयुद्द-
नारायण राणे: या कार्यक्रमात राजकारण करू नये असे वाटत होतं…. मुख्यमंत्री कानाजवळ काहीतरी बोलले, मी एक शब्द ऐकला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे: काही वेळेला केंद्रीय मंत्र्यांशी बोलावं लागतं. पण बरेचदा हे बोलणं हे कोरडं असतं.
नारायण राणे: कोकणाची आर्थिक समृद्धी व्हावी यासाठी हे विमानतळ बांधण्यात आले आहे. मी १९९० ला इथे आलो आणि त्यानंतर मी संपूर्ण सिंधुदुर्गच्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे: आजचा क्षण हाक काही आदळआपट करण्याचा क्षण नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा क्षण आहे. ज्योतिरादित्य तुम्ही मराठी मातीचा संस्कार विसरला नाहीत. मातीत बाभळीचे असतात. तसे कोकणच्या मातीत बाभळी उगवल्या आहेत. आता बाभळ उगवली तर माती म्हणेल मी काय करू?
नारायण राणे: गोपीनाथ मुंडेंशी बोलून मी सिंधुदर्गातील पूल आणि रस्त्यांसाठी १२० कोटी रुपये दिले. त्यानंतर पिण्याचे पाण्यासाठी १८० कोटी रुपये दिले, त्यापूर्वी जिल्ह्याला केवळ ८०-९० लाख रुपयेच येत होते. जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधांच्या विकासाचे कारण नारायण राणे आहे, दुसऱ्या कोणाचेही नाव येऊ शकत नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे: निदान छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला तरी बांधला. कारण कोणीतरी म्हणल मीच बांधला.
क्लिक करा आणि वाचा- रामदास आठवलेंनी चिपी विमानतळावरून उडवले कवितेचे विमान
नारायण राणे: खासदार विनायक राऊत माझ्याकडे पेढे घेऊन आले. मी थोडा घेतला कारण मधुमेह आहे. मी म्हटले की राऊतजी या पेढ्याचा गुणधर्म गोड आहे, तो आत्मसात करा. चांगल्या शैलीत बोला, हसत बोला. व्यक्तीकडे चांगला विचार असावा. विचारांनी माणसाला जिंकता येतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे: पेढ्यातला गोडवा दाखवावा लागतो, तो अंगी बाणगावा लागतो. नाहीतरी आपल्याकडे म्हणतातच की तिळगूळ घ्या गोड बोला. ही जाहीर सभा नाही. नाईलाजाने बोलावं लागलं. हा कार्यक्रम माझ्या कोकणासाठी आणि राज्यासाठी महत्वाचा आहे.
नारायण राणे: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खोटं बोलणं अजिबात आवडत नव्हतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे: हे खरं आहे की शिवसेनाप्रमुखांना खोटं अजिबात आवडत नव्हतं. म्हणून तर त्यांनी जे खोटं बोलत होते त्यांना शिवसेनेबाहेर काढलं हा इतिहास आहे. जो खोटं बोलतो त्याला ते म्हणाले गेट आऊट.
नारायण राणे: मी आदित्यला शुभकामना देईन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं काम करून दाखवा. मला आनंद वाटेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे: पाठांतर करून बोलणं वेगळं आणि तळमळीने बोलण वेगळं. काहीवेळा मळमळीने बोलणंही असतं. त्याबद्दल मी नंतर बोलीनच.
क्लिक करा आणि वाचा- मविआची ११ ऑक्टोबरला बंदची हाक; ‘दोन्ही काँग्रेसह शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार’
नारायण राणे: विमानतळावर उतरल्यावर खड्डे पाहायचे का?, एमआयडीसीने आसपासच्या रस्त्यांचा विकास करायला पाहिजे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे: आजपर्यंत खडे्डे मग ते कारभाराचे असतील किंवा रस्त्यावरचे असतील, ते बुजवण्याचे काम केले पाहिजे. ते बुझवण्याचं काम एकत्र केलं पाहिजे. विकासाच्या कामात राजकीय जोडे येता कामा नयेत.
नारायण राणे: विमानतळ परिसराच्या आसपास ब्युटीफिकेशन करण्याची आवश्यकता आहे. पर्यटक विमानतळावर उतरल्यानंतर पर्यटकाला परिसर चांगला दिसला पाहिजे, तो आनंदी झाला पाहिजे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे: सौंदर्याला नजर लागू नये म्हणून आपल्याकडे काळा टीका लावतात. काही काळा टीका लावणारे लोकही आहेत.