मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. ते सगल तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यांनी राष्ट्रपती भवनात आपल्या नवीन मंत्रिमंडळासोबत शपथ घेतली. मोदी सरकार ३.० मधील एकूण मंत्र्यांची संख्या ७२ आहे, त्यापैकी ३० मंत्री मंत्रिमंडळाचा भाग असतील. याशिवाय ५ मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. तर ३६ खासदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. गेल्यावेळी मंत्रिमंडळात असलेल्या अनेक मंत्र्यांना मोदी मंत्रिमंडळ ३.० मध्येही संधी देण्यात आली आहे.
कोणाला किती मंत्रिपदं?
मंत्रिमंडळ स्थापनेनंतर आता सर्वांच्या नजरा या कोणाला कुठलं खातं मिळतं याकडे लागलं आहे. आता मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात कोणत्या मंत्र्याला कुठली जबाबदारी मिळते हे पाहावं लागेल. मोदी ३.० मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या एकूण कॅबिनेट मंत्र्यांपैकी २५ भाजपचे आहेत आणि ५ मंत्रीपदं मित्रपक्षांना देण्यात आली आहेत. त्याचबरोबर ५ खासदारांना स्वतंत्र प्रभार देऊन राज्यमंत्री करण्यात आले आहे. त्यात भाजपकडून तीन, जयंत चौधरी यांच्या रूपाने आरएलडीकडून एक आणि प्रतापराव जाधव यांच्या रूपाने शिवसेनेकडून एकाचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपने जातीय समीकरण जपलं
मोदी मंत्रिमंडळ ३.० मध्ये जातीय समीकरण जपले गेले आहे. यावेळी २७ मंत्री ओबीसी आणि २ एसईबीसी, या प्रवर्गातून एकूण २९ जणांना मंत्री करण्यात आले आहे. एसईबीसी ही ओबीसीची उप-श्रेणी आहे. ओबीसी-ईबीसी नंतर सामान्य श्रेणी येते. भाजपची मूळ व्होट मानल्या जाणाऱ्या सामान्य वर्गातून २८ मंत्री, अनुसूचित जाती (एससी) मधील १० आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५ मंत्री मोदी सरकारमध्ये स्थान देण्यात आलं आहे. ख्रिश्चन समुदायातूनही एकाला मंत्री करण्यात आले आहे.