Home Loan: होम लोन फेडण्याची घाई, संकटात नेई; कर्ज फेडण्यासाठी ऑनलाइन गेमचा आधार अन् सारं संपलं

छिंदवाडा: घरासाठी कर्ज घेतलं आणि मग ते कर्ज फेडण्यासाठी एका महिलेने असा मार्ग निवडला की तिला तिचा जीव द्यावा लागला. ही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील जुन्नरदेव येथे घडली आहे. येथे राहणाऱ्या एका कुटुंबात पती शिक्षक तर पत्नी महिला व बालविकास विभागात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होती. दोघेही चांगले आयुष्य जगत होते. या दोघांनी स्वतःचे घर बांधण्याचा विचार केला आणि त्यासाठी होमलोन घेतलं. कर्जाची रक्कम लवकर फेडण्यासाठी ही महिला ऑनलाइन गेमिंग ॲपच्या मोहात पडली आणि कर्जाच्या जाळ्यात आणखी अडकली. अखेर या महिलेने मृत्यूला कवटाळलं. या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत जुन्नरदेव पोलिस ठाण्याचे अधिकारी राकेश बघेल यांनी सांगितले की, सल्लम कुटुंबीय चटुआ येथे राहतं. ४५ वर्षीय हरिराम हरचंद सल्लम हे कुंझिरी येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांची पत्नी ३८ वर्षीय सरला सल्लम या जुन्नरदेवच्या महिला व बालविकास विभागात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होत्या. मुलगी खुशबू शिक्षण घेत आहे. शनिवारी हरिराम शाळेत गेले होते. सायंकाळी ५.१५ वाजता मुलीने फोन करून सांगितले की, आई सरला यांनी स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं आणि गळफास लावून आत्महत्या केली.

हरिराम घरी पोहोचल्यावर त्यांना पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर त्यांनी सासू ग्यास्वती, भाऊ शिवराम, मेहुणा शैलेंद्र, मित्र सद्दाम आणि इतरांना फोन केला आणि पोलिसांनाही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदन केले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रम्मी खेळण्यासाठी नातेवाईकांकडून कर्ज घेतले होते

मिळालेल्या माहितीनुसार, सरला एक खूप समजुतदार महिला होती. पण, एक दिवस ती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रम्मी सर्कल ॲपवर आली. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर या ॲपच्या जाहिराती येतात ज्यामध्ये अनेकजण दररोज लाखो जिंकताना दाखवले जातात. सरलाला हे गेमिंग ॲप तिच्या कर्जाची परतफेड करण्याचा एक चांगला मार्ग वाटला. तेव्हापासून ती सतत खेळात मग्न असायची, मध्यरात्रीपर्यंत जागे राहून खेळ खेळायची.

पतीने दिलेल्या माहितीनुसार, ती कर्जाची रक्कम फेडण्यासाठी ऑनलाइन ॲप्सची मदत घ्यायची, परंतु त्यानंतर ती रम्मी सर्कल ॲपमध्ये सतत खेळत होती आणि दररोज पैसे गमावल्यामुळे कर्जबाजारी झाली होती. पती हरिरामने तिला अनेकदा समजावून सांगायचे की त्या लवकरच कर्जातून बाहेर पडतील. पण, सरला यांनी या कर्जातून बाहेर पडण्यासाठी टोकाचा निर्णय घेतला आणि थेट जगाचा निरोप घेतला. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Source link

chhindwara crime newschhindwara newsChhindwara online gamingHome LoanHow To Repay Home Loan Soonloan repaymentOnline GamingWoman Ends Life Because Online Gameऑनलाइन गेमिंगमहिलेची आत्महत्यारमी सर्कल अॅपरम्मी सर्कल
Comments (0)
Add Comment