नेमकं काय घडलं ?
आज सकाळी १०. ४० च्या सुमारास ही घटना घडली. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या ताफ्यातील काही गाड्या इम्फाळ आणि जिरीबाम जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-३७ वरून जात होत्या. आणि त्या गाड्या कोटलेन गावात पोहोचताच त्यांच्यावर एका कारमधील अज्ञात व्यक्तींनी जोरदार गोळीबार सुरू केला. ताफ्यातील सुरक्षा रक्षकांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही काळ गोळीबार सुरूच होता.
सुरक्षा रक्षकाच्या खांद्याला लागली गोळी
कारमधून हल्ला करणारे एकूण तीन जण होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव मोइरंगथेम अजेश असे असून ते बिष्णुपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्याच्या उजव्या खांद्यावर गोळी लागली. त्यानंतर त्यांना तातडीने इंफाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना ठरवून बोलावलं गेलं ?
आतापर्यंत पोलिसांना हल्लेखोरांबाबत कोणताही पुरावा किंवा माहिती मिळालेली नाही. ज्या गावात हा हल्ला झाला ते गाव कांगपोकपी जिल्ह्यात येते, जे इम्फाळपासून २६ किमी अंतरावर आहे. कुकी-झोमी नावाच्या जमातीचे लोक येथे राहतात
इंडिया टुडेने माणिपूर मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांच्या आधारे एक वृत्त दिले आहे. त्यांनी असं म्हंटलं की, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांची जिरीबामला भेट वेगळ्या हेतूने घडवून आणली अशी शंका व्यक्त केली जात आहे. जिरीबामला या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अशांततेचे वातावरण आहे. (६ जून) रोजी काही अज्ञात अतिरेक्यांनी मेईतेई समुदायातील एका व्यक्तीची हत्या केली होती. यानंतर शहरात मोठा हिंसाचार झाला होता. जिरीबाममधील दोन पोलिस चौक्या, एक बीट कार्यालय आणि सुमारे ७० घरे जाळण्यात आली होती.
२३९ मेईतेई लोकांना घरे सोडावी लागली
जिरीबाममध्ये मेईतेई , मुस्लिम, नाग, कुकी आणि गैर-मणिपुरी राहतात. गेल्या वर्षी (३ मे) रोजी सुरू झालेल्या जातीय हिंसाचारातही, इतर ठिकाणांच्या तुलनेत येथील परिस्थिती तुलनेने शांत होती. मात्र या एका हत्येनंतर जीवित व वित्तहानी ही झाली. त्यामुळे सुमारे २३९ मेईतेई लोकांना त्यांची घरे सोडावी लागली.