Modi Cabinet 2024: महाराष्ट्राची बोळवणच; गडकरी, गोयल वगळता अन्य मंत्र्यांना कमी महत्त्वाची मंत्रालये, वाचा यादी

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात नितीन गडकरी आणि पीयूष गोयल वगळता इतर महाराष्ट्रातील इतर मंत्र्यांना फारशी महत्त्वाची मंत्रालये मिळालेली नसल्याचे चित्र आहे. रामदास आठवले यांच्याकडील समाजकल्याण राज्यमंत्रिपदाची परिस्थिती जैसे थे आहे.

अवघा एक खासदार निवडून आणणारे बिहारच्या हिंदुस्थान आवाम मोर्चाचे जितनराम मांझी कॅबिनेट मंत्री झाले आहेत. दुसरीकडे लोकसभेत ७ खासदार असणाऱ्या शिवसेनेला केवळ एक राज्यमंत्रिपद व तेही आयुष मंत्रालयाचे देऊन मोदी सरकारकडून बोळवण करण्यात आली. शिवसेनेचे एकमेव राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर आयुष मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाच्या स्वतंत्र प्रभारासह व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मोदी-अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना, लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आगामी विधानसभेकडे लक्ष द्या, असा संदेश दिल्याचे समजते.

नितीन गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. गोयल उत्तर मुंबईतून प्रथमच लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांना पुन्हा वाणिज्य मंत्रालय मिळाले आहे. तिसरे ज्येष्ठ मंत्री रामदास आठवले यांच्याकडे समाजकल्याण राज्यमंत्रिपद कायम ठेवले आहे. तीनदा निवडणूक जिंकणाऱ्या परंतु यंदा प्रथमच मंत्री झालेल्या रक्षा खडसे यांच्याकडे युवा कार्य व क्रीडा मंत्रिपद असेल. पुण्यातून पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ हे नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री असतील. उत्तर गोव्याचे ज्येष्ठ खासदार श्रीपाद येसो नाईक यांची आयुष मंत्रालयातून गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्रिपदी बदली करण्यात आली आहे.

Modi Cabinet 2024 Ministers and Portfolios: मोदी सरकार ३.० सरकारमधील खाते वाटप जाहीर, एका क्लिकवर संपूर्ण यादी
राज्याला मिळालेली मंत्रिपदे
नितीन गडकरी- रस्ते आणि महामार्ग
पीयूष गोयल- वाणिज्य
मुरलीधर मोहोळ- सहकार आणि नागरी हवाई राज्यमंत्री
प्रतापराव जाधव- आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री
रामदास आठवले- सामाजिक न्याय राज्यमंत्री
रक्षा खडसे- क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री

Source link

bjpCabinet MinisterMaharashtra politicsmodi cabinet 2024modi cabinet 2024 ministers and portfoliosnda govtNitin Gadkaripiyush goyalरामदास आठवले
Comments (0)
Add Comment