चंद्रबाबू नायडूंचा टिडीपी लोकसभेचं अध्यक्षपद मागत असताना भाजपकडून या पदासाठी डी. पुरंदेश्वरी यांचं नाव चर्चेत आलं आहे. पुरंदेश्वरी यांचं नाव लोकसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. राजमुंदरी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या पुरंदेश्वरी तिसऱ्यांदा लोकसभेवर गेल्या आहेत. त्या आंध्रप्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. पुरंदेश्वरी यांची निवड करुन एका दगडात दोन पक्षी मारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
१८ जूनपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदाचा विषय कळीचा ठरणार आहे. टिडीपीचा हट्ट पूर्ण करण्यास भाजप तयार नाही. लोकसभा अध्यक्षांकडे असलेले अधिकार पाहता भाजपला हे पद महत्त्वाचं वाटत आहे. या पदावर दुग्गुबती पुरंदेश्वरी यांची वर्णी लागू शकते. त्या आंध्रप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि दक्षिणेतील दिग्गज नेते राहिलेल्या एनटी रामाराव यांच्या धाकट्या कन्या आहेत. टिडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंच्या त्या मेहुण्या लागतात. त्यामुळे त्यांचं नाव पुढे करुन भाजप नायडूंचं मन वळवू शकतो.
पुरंदेश्वरी यांचं शालेय शिक्षण चेन्नईतील सेक्रेट हार्ट मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूलमध्ये झालं आहे. त्यानंतर त्यांनी चेन्नईच्या साऊन इंडियन एज्युकेशनल ट्रस्ट अँड वुमन कॉलेजात प्रवेश घेतला. तिथे त्यांनी साहित्यात बीए केलं. त्यानंतर जेमोलॉजीमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. १९९७ मध्ये त्यांनी हैदराबाद इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरीची पायाभरणी केली.
पुरंदेश्वरींना पाच भाषा येतात. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, फ्रेंच भाषा त्यांना अवगत आहेत. १९७९ मध्ये त्यांचा विवाह दग्गुबती व्यंकटेश्वर राव यांच्याशी झाला. त्यांना दोन मुलं आहेत. पुरंदेश्वरी आधी काँग्रेसमध्ये होत्या. यूपीए २ मध्ये त्यांनी मनुष्यबळ आणि विकास राज्यमंत्री म्हणून काम केलं. २०१२ मध्ये त्यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचं राज्यमंत्रिपद देण्यात आलं. काँग्रेसनं आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा निर्णय घेतल्यानं त्या नाराज झाल्या. २०१४ मध्ये लोकसभेच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये पुरंदेश्वरींना महिला आघाडीचं प्रभारीपद देण्यात आलं. त्यानंतर त्यांचा आलेख चढता राहिला. २०२० मध्ये त्यांच्याकडे ओडिशाचा प्रभार देण्यात आला. मग त्यांच्याकडे आंध्रप्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. पुरंदेश्वरी देवी यांचा स्वभाव अतिशय शांत आहे. त्यामुळे त्यांना दक्षिणेच्या सुषमा स्वराज म्हटलं जातं.