दिल्ली पोलिसांनी सोमवारी स्पष्ट केले की, शपथविधी सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणात दिसणारा प्राणी हा एक पाळीव मांजर होती, कुठला जंगली प्राणी नव्हता. नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या ७१ मंत्र्यांनीही राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. या सोहळ्यादरम्यानची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये राष्ट्रपती भवनाच्या कॉरिडॉरमध्ये एक प्राणी फिरताना दिसून आला.
राष्ट्रपती भवनातील शपथविधी समारंभाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणारा प्राणी हा बिबट्या आहे, असं नेटकरी म्हणतक होते. तो अत्यंत धोकादायक प्राणी असून शपथविधी समारंभात कुठली दुर्दैवी घटना घडली असती, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. मात्र, आता दिल्ली पोलिसांनी या सर्व अफवांवर पूर्णविराम लावला आहे. कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्राणी सामान्य पाळीव मांजर असून बिबट्या नसल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे. मोदी मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या पहिल्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले, तर यावेळी सरकारमध्ये कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार हे देखील आता स्पष्ट झालं आहे.
यामध्ये राजनाथ सिंह संरक्षण मंत्री, अमित शहा गृहमंत्री, नितीन गडकरी रस्ते वाहतूक मंत्री, एस जयशंकर परराष्ट्र मंत्री आणि निर्मला सीतारामन अर्थमंत्री राहतील. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर मनोहर लाल खट्टर यांच्याकडे ऊर्जा आणि शहरी विकास मंत्रालय देण्यात आले आहे.