घडले असे की, गेल्या काही दिवसांत एका दुर्घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये राजस्थानच्या जयपूरातील सुरवाल येथे झालेल्या अपघातात एक युवक गंभीर झाल्याचे सांगण्यात आले. त्याच्यासाठी मदतीचे आवाहन देखील करण्यात आले होते. हा फोटो जेव्हा श्योपूर जिल्ह्याच्या लहचौडा येथे राहणाऱ्या दीनदयाल शर्मा कुटुंबियांच्या नजरेस पडला, तेव्हा त्यांनी त्या फोटोतील व्यक्तीला आपला मुलगा समजले. आणि त्यांनी घाईघाईने जयपूर गाठले.
जयपूर गाठताच उपचारादरम्यान सुरेंद्रचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले. शवविच्छेदनापूर्वी ओळख पटवण्यासह सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. कुटुंबियांनी 28मे ला लहचौडा येथे या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यानंतर तेराव्याची तयारी सुरू असताना अचानक तोच सुरेंद्र कुटुंबियांसमोर चक्क जीवंत उभा ठाकला. जे पाहून कुटुंबियांसोबतच संपूर्ण गाव देखील अचंबित झाले.
तेराव्याच्या एक दिवस आधी आला फोन
लहचौडा गावात सुरेंद्रच्या घरी तेराव्याची तयारी सुरू होती. आपला तरुण मुलगा गेल्याने कुटुंबातील सर्व सदस्य दु:खी झाले होते. तेराव्याच्या एक दिवस आधी सुरेंद्रच्या भावाला त्याचा फोन आला. सुरुवातीला भावाला हा विनोद वाटला आणि नंतर व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. सुरेंद्रला व्हिडिओ कॉल लावताच कुटुंबीयांनी सुरेंद्र चक्क सुखरुप दिसला. त्याच्याशी बोलून घरी परतण्यास सांगितले. यानंतर दुसऱ्याच दिवशी सुरेंद्र घरी परतला आणि तेराव्याची सर्व तयारी थांबवण्यात आली.
राजस्थान पोलिसांनी फोटो दाखवताच सोशल मीडियावर करण्यात आला व्हायरल
राजस्थानमधील सुरवालमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या खिशात ‘कुशवाह ढाबा श्योपूर’ नावाने जेवणाचे बिल असल्याचे आढळून आले होते. याआधारे सुरवळच्या पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यासाठी श्योपूरला गाठले आणि त्यांनी समाजसेवक बिहारी सिंग सोलंकी यांच्यासह काही लोकांना फोटो दाखवले. बिहारी सिंह सोलंकी यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता, जो लगेच व्हायरल झाला. दीनदयाल शर्मा यांच्या कुटुंबीयांनी मात्र हा फोटोतील व्यक्ती ओळखण्यात गल्लत केली.
सुरेंद्र शर्मा जयपूर मध्ये करत होता नोकरी
युवक सुरेंद्र शर्मा म्हणाला की, तो जयपूर शहरातील एका कपड्याच्या कारखान्यात सुपरवायझर म्हणून काम करतो. गेल्या महिन्यात घरी सुट्टीसाठी आल्यानंतर तो परत जयपूरला नोकरीसाठी गेला. यावेळी त्याचा मोबाईल खराब झाला आणि 2 महिन्यांपासून तो कुटुंबीयांशी संपर्क करू शकला नाही. यामुळे ही सर्व अजब घटना घडली.
सुरेंद्रची आई कृष्णा देवी म्हणाल्या की, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आमच्या घरातील लोकांनी एक अज्ञात मृतदेह सुरेंद्रचा असल्याचे ओळखले. त्यानंतर अंत्यसंस्कार करून सर्व विधी देखील पार पडले. पण काल सुरेंद्रचा फोन आल्यावर आम्हाला आमच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. व्हिडिओ कॉल केल्यावर चक्क सुरेंद्र दिसला. आम्ही त्याला घरी यायला सांगितले. तो आला आहे आणि आम्ही सर्व खूप आनंदी आहोत.