आता यात आणखी भर पडली असून संघाच्या मुखपत्रामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या कामगिरीबाबत आरएसएसच्या सदस्या रतन शारदा यांनी एक लेख प्रसिद्ध केला आहे. त्यात भाजपचा ‘अतिआत्मविश्वास’ हा पराभवाचे कारण असल्याचे म्हंटलं आहे.
सेल्फी शेअर करून निवडणूक जिंकता येत नाही
रतन शारदा यांच्या लेखात भाजपच्या ‘४०० पार’ या घोषणेचा उल्लेख आहे. शारदा म्हणतात की,” २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता भाजपला आपला मार्ग सुधारण्याची गरज आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालातून अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप कार्यकर्त्यांचे आणि अनेक नेत्यांचे वास्तविकता दाखवणारे चित्र समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४०० पारची केलेली घोषणा ही एक प्रकारे विरोधकांसाठी आव्हान होते. हे काही नेत्यांच्या लक्षात आले नाही. फक्त सोशल मीडियावर पोस्टर आणि सेल्फी शेअर करून नव्हे तर जमिनीवर कठोर परिश्रम करून ध्येय गाठले जाते.” असे म्हणत रतन शारदा यांनी भाजपच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची कान उघडणी केली आहे.
उमेदवार निवडण्यात चूक झाली
लेखात पुढे म्हटले की, ”उशीरा येणाऱ्यांना लोकांना सामावून घेण्यासाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांचाही बळी देणे हानिकारक ठरले. सुमारे २५ टक्के उमेदवार हे स्थलांतरित होते. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची उदासीनताही मोठ्या प्रमाणात दिसून आली. आणि भाजपचा पराभव झाला.
राष्ट्रवादीला सोबत का घेतलं?
दरम्यान, या लेखात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर देखील महत्त्वपूर्ण भाष्य करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, ”महाराष्ट्र हे अनावश्यक राजकारण आणि टाळता येण्याजोगे हेराफेरीचे प्रमुख उदाहरण आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपबरोबर आला नसता तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला आरामात बहुमत मिळाले असते. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भांडणात राष्ट्रवादीची ताकद संपली असती. याचा फायदा भाजपला झाला असता हे माहीत असताना सुद्धा चुकीचे पाऊल का उचलले गेले? असा सवाल भाजपच्या नेत्यांसाठी उपस्थित करण्यात आला आहे.