परीक्षेच्या पवित्रतेला धक्का
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि एहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या सुट्टीकालीन खंडपीठात ही सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने एनटीएला खडे बोल सुनावत म्हटले की, ‘ही गोष्ट एवढी साधी नाही की केवळ तुम्ही ही परीक्षा घेतली आहे म्हणून सगळं काही पवित्र आहे. परीक्षेच्या पवित्रतेला धक्का पोहोचला आहे.म्हणून आम्हाला उत्तर हवे आहे.’ यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील मॅथ्यू जे. नेदुंपरा यांनी काउन्सिलिंग प्रक्रीया स्थगित करण्याची विनंती केली. दरम्यान परीक्षा व काउन्सलिंग(समुपदेशन) प्रक्रिया रद्द करुन नव्याने परीक्षा घेण्याच्या याचिकाकर्त्यांच्या मागणीला नकार देत खंडपीठ म्हणाले की, ‘काउन्सलिंग सुरु होवू द्या,आम्ही काउन्सलिंग थांबवत नाही आहोत.’
या वर्षी तब्बल ६७ विद्यार्थी अव्वल
पदवी पूर्वीच्या एमबीबीएस,बीडीएस तसेच आयुष यांसारख्या वैद्यकीय शिक्षणातील प्रवेशासाठी अनिवार्य असणारी नीट ही परीक्षा प्रतिवर्षी होत असते. ही परीक्षा केंद्र शासनाच्या एनटीए (राष्ट्रीय परीक्षा एजन्सी ) कडून घेतली जाते. यावेळी ही परीक्षा ५ मे रोजी पार पडली व त्याचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला. निकाल जाहीर होताच अनेक विद्यार्थी व पालक यांनी परीक्षेत गोंधळ झाल्याचा आरोप केला. या परीक्षेत आजवर केवळ ३-४ विद्यार्थीच अव्वल येत होते परंतु या वर्षी तब्बल ६७ विद्यार्थी अव्वल आल्याने परीक्षेत घोटाळा झाल्याचे आरोप अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी केला होता. दरम्यान निकालानंतर होणारी काउन्सलिंग प्रक्रिया थांबवून परीक्षा पुन्हा घेण्यात यावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
पुढील सुनावणी ८ जुलै रोजी
शिवांगी मिश्रा आणि इतर ९ व्यक्तींनी परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. परीक्षेचा निकाल देखील एनटीएच्या नियोजित वेळापत्रकाच्या १० दिवस आधी जाहीर करण्यात आला होता.तसेच अनेक परीक्षा केंद्रांवर पेपरफुटी आणि गोंधळ झाल्याचे आरोप करण्यात आले होते.परंतु एनटीएने परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप फेटाळले होते. आता या सर्वांवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे अनेक पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.न्यायालयाने पुढील सुनावणी ८ जुलै रोजी जाहीर केली आहे.