हायलाइट्स:
- पुणे जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊस
- पावसामुळं उजनी धरण तुडुंब भरले, विसर्ग सुरू
- भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सूर्यकांत आसबे । सोलापूर
पुणे जिल्ह्यात (Pune Rain) झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात (Ujjani Dam) क्षमतेपेक्षा जास्त (१२१.९३ टीएमसी) पाणी भरले आहे. त्यामुळे रविवार सकाळी सात वाजता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात २० हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाचा: राहुल व प्रियंका गांधींची स्तुती करताच संजय राऊत टीकेच्या रडारवर
उजनी धरण १०० टक्के भरल्यामुळे धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी आणि उद्योजकांनी आनंद व्यक्त केला आहे. ११७ टीएमसीचे उजनी धरण भरून पाणी पातळी वाढल्यामुळे अखेर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याला सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ४९७.२२० मीटर होती. तर उजनीतील पाणीसाठा १२१.९३ टीएमसी झाला आहे. धरणात ५८.२७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून उजनीची टक्केवारी १०८.७६ इतकी झाली आहे. दौंडमधून दहा हजार ५५१ चा विसर्ग सुरू आहे तर बंडगार्डन येथून ९ हजार ५० चा विसर्ग करण्यात असल्यामुळे उजनी धरणाचा पाणीसाठा वाढत चालल्यामुळे रविवारी सकाळी सात वाजल्यापासून धरणातून २० हजार क्युसेक्सने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
शनिवारी पुण्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणात पाण्याचा साठा वाढू लागल्यामुळे शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या पुढे ५ हजार क्युसेकने भीमा नदीच्या पात्रात धरणातून पाणी सोडण्यात सुरुवात झाली. त्यानंतर रविवारी सकाळी यामध्ये आणखी १५ हजार क्युसेक्सने वाढ करून २० हजार क्युसेकने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. उजनीतून पाणी सोडण्यात आल्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाचा: राहुल गांधींनी संजय राऊतांकडं बोलून दाखवली मनातली ‘ही’ खंत