देवघर :
मंदिर हिंदू धर्मियांसाठी पवित्र स्थान आहे. धार्मिक भावना जोपासण्यासाठी देऊळ किंवा मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर घरातील देवघर देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. तुम्ही पाहिलं असेल घर लहान जरी असले तरी तिथे देवघर असते. अनेकांना हा प्रश्न पडतो, मी देवघरातील देवांची पूजी करतो किंवा त्यांची नित्यनियमाने आराधना करतो, मग मी बाहेरील मंदिरात खास करून का जायला हवे?
वैयक्तिक आणि कौटुंबिक धार्मिक विधींसाठी देवघर महत्त्वाचे आहे. मुख्य देवता, कुलदेवता किंवा शिवलिंगाची मूर्ती विशेषतः देवघरात स्थापित केली जाते. पण घरच्या मंदिरात मूर्ती आणि पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी मर्यादा येतात आणि अनेक नियमांचे पालनही करावे लागते. दोनपेक्षा जास्त शिवलिंग, तीनपेक्षा जास्त गणपतीच्या मूर्ती, दोन शंख इत्यादी घरात ठेवता येत नाही.
देऊळ किंवा मंदिर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत. येथे समाजातील लोकांसोबत धार्मिक अधिष्ठान केले जाते. विविध देवी-देवतांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. सर्व नियमांमध्ये पारंगत असलेल्या पुरोहितांकडून पूजा केली जाते आणि तेथे नियमानुसार आणि शास्त्रात सांगितलेल्या वेळेनुसार पूजा केली जाते. देवळातील उर्जा घरच्या मंदिरातील उर्जेपेक्षा अधिक असते. आपण जेव्हा देवघरात पूजा करतो तेव्हा कौंटुबिक गोष्टीमुळे आपले मन विचलीत होण्याची शक्यता असते. जेव्हा मंदिरात पूजा करतो किंवा फक्त हात जोडून उभे राहता, तेव्हा विशेष सकारात्मक ऊर्जेची अनुभूती तुम्ही करता. दिवसभर मंदिरात पूजा-विधी, ध्यानधारणा, यज्ञ, मंत्र- स्तोत्र पठण सुरु असते. एकणूच पूजेचा आवाका मोठा असतो. त्यामुळे देवळात विशेष सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होते.
आता आपण म्हणतो, देव सगळीकडे आहे मग मी मंदिरात का जावू? तर यावर एक उदाहरण सांगते, हवा सगळीकडे आहे, बरोबर ! समजा गाडीच्या चाकातील हवा निघून गेली तर त्या चाकाचा काही उपयोग नाही. आता हवा सगळीकडे आहे, चला मी ते चाक उघडतो आणि वातावरणातील हवा त्यात जाईल आणि गाडीचे चाक पूर्ववत होईल… पण असे होते का? नाही !! त्याचप्रमाणे तो परमात्मा सगळीकडे आहे पण आपल्यात ते सामर्थ्य नाही किंवा आपली भक्ती तेवढी शक्तीशाली नाही की, सगळीकडे आपल्याला त्या परमशक्तीचे दर्शन होईल. मग तुम्ही त्या परमशक्तीची अनुभूती कुठे करू शकता? तर मंदिरात ! त्यासाठीच मंदिर बांधलेले आहे. अ्से सांगितले जाते की, देवळात अरूपाला रूप दिलं जातं, प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि प्रसंगी अनंताचं विसर्जनही होतं. जी मागणी तुम्ही कोणाजवळ मागू शकत नाही, ती आपण देवाजवळ करतो, ते आधारस्थान तुम्हाला देवळात मिळतं. आता काहींना असा आधार पसंत नसेलही पण काहींना असा आधार घ्यावासा वाटतो.
देवघर आणि देऊळ यातील फरक काही प्रमाणात वरील मुद्द्यांमधून करण्यात आलेला आहे. दरम्यान देवघर असो वा देऊळ दोघांचा उद्देश तुमच्या धार्मिक भावनांचे समाधान करणे, तुम्हाला सुख-शांती-समाधान देणे हाच आहे. देवघरासाठी मर्यादित साधनं आहेत, पण तुमची श्रद्धा तितकीच मजबूत आहे, जितकी देवळाप्रती तुमची भक्ती आहे. साधू-संत असेही म्हणतात, लक्षात ठेवा, तुमच्या हृदयाच्या मंदिरात विराजमान असलेला परमेश्वर सुद्धा श्रेष्ठ आहे. जर तिकडे तुमची श्रद्धा कमी पडली तर मग देवघर काय आणि देऊळ काय, ती फक्त कर्मकांडापुरती मर्यादित राहतील.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.