हायलाइट्स:
- करोना निर्बंधांबाबत महापालिकेचा मोठा निर्णय
- आधीचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार
- मुंबईतील दाट लोकसंख्येमुळे घेतला निर्णय
मुंबई : राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया (Maharashtra Unlock) राबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध शहरातील निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. राजधानी मुंबईत करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने तयार केलेल्या निकषानुसार आता मुंबई शहर पाचव्या लेव्हलमध्येही पोहोचू शकते. मात्र असं असलं तरीही मुंबईत निर्बंध आणखी शिथिल केले जाणार नाहीत. याबाबतचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं (BMC Decision About Restrictions In Mumbai) जारी केला असून मुंबईत लेव्हल ३ नुसारच आधीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
मुंबई शहरात करोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आला असला तरी मुंबई तूर्त लेव्हल ३ मध्येच राहणार आहे.
कोणत्या कारणांमुळे निर्बंध शिथिल होणार नाहीत?
मुंबई शहरातील करोना निर्बंध शिथिल करण्याचे सर्व मार्ग खुले झाले असले तरीही आधीचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. या निर्णयामागे शहरातील लोकसंख्या हे मुख्य कारण असून या निर्णयामागे इतरही काही कारणे आहेत.
.
१. शहरातील दाट लोकसंख्या
२. लोकलमध्ये होणारी गर्दी
३. हवामान विभागाकडून देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा
दरम्यान, महानगरपालिकेच्या या आदेशामुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली होईल, अशी आशा बाळगणाऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. नवा आदेश येईपर्यंत आधीचे नियम कायम राहतील, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई शहरात इतर निर्बंध नेमके कधी खुले होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.