पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र दौऱ्यावरून नेहमीच चर्चा रंगलेली असते. इतकेच काय तर या परदेश दौऱ्यावरून अनेकदा विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेचा सामनाही मोदींना करावा लागतो. नुकताच पंतप्रधान मोदी यांचा शपथविधी झाला असून ते आपल्या परराष्ट्र दौऱ्याची सुरुवात कोणत्या देशापासून करणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर पंतप्रधान मोदी हे इटली या देशात पहिला परराष्ट्र दौरा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दौऱ्यामागचं कारण काय ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी 7 शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी गुरुवारी ते इटलीमधील अपुलिया येथे जाणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, ”इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांच्या आमंत्रणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 व्या जी 7 शिखर संमेलनात सहभाग घ्यायला उद्या इटलीतील अपुलिया येथे जाणार आहेत. हे संमेलन 14 जून रोजी इटलीत होणार असून भारताला त्यात आउटरिच सदस्य देश म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे.”
आंतरराष्ट्रीय व्यापार,इस्रायल- हमासमधील संघर्षावर होणार चर्चा
इटलीला यावर्षी 1 जानेवारीला जी 7 शिखर संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले आहे. या शिखर संमेलनात आंतरराष्ट्रीय व्यापार, हवामान बदल आणि रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम, जागतिक आर्थिक परिस्थिती व इस्रायल- हमासमधील संघर्ष यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
मोदींनी 2014 ला भूतान तर 2019 ला मालदीवचा केला होता दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी भूतानचा पहिला परदेश दौरा केला होता. त्यानंतर 2019 साली पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मालदीवचा पहिला परदेश दौरा केला होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या परराष्ट्र दौऱ्याची सुरुवात इटलीपासून होणार आहे.