ओडिशा, आंध्रमध्ये नवे पर्व; मोहनचरण माझी, चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

वृत्तसंस्था, भुवनेश्वर : चार वेळा आमदार राहिलेले आदिवासी नेते मोहनचरण माझी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून बुधवारी शपथ घेतली. ते ओडिशात भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. तर तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.माझी यांच्या शपथग्रहण समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मावळते मुख्यमंत्री नवीन पटनाईकही या सोहळ्याला उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पाटणागढचे आमदार के. व्ही. सिंह देव आणि निमापाडा विधानसभा मतदारसंघातून प्रथमच आमदार झालेल्या प्रवती परिदा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रघुबर दास यांनी जनता मैदानात माझी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना गोपनीयतेची आणि पदाची शपथ दिली. सुरेश पुजारी, रविनारायण नायक, नित्यानंद गोंड, कृष्णचंद्र पात्रा, पृथ्वीराज हरिचंदन, मुकेश महालिंगा, विभूतिभूषण जेना आणि कृष्णचंद्र मोहपात्रा यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली.

ओडिशामध्ये भाजपला पहिल्यांदाच स्पष्ट जनादेश मिळाला असून, बिजू जनता दलाचा (बीजेडी) २४ वर्षांचा सत्ताकाळ संपुष्टात आला आहे. ओडिशाच्या १४७ जागांपैकी ७८ जागा जिंकून भाजप सत्तेवर आला; तर पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील बीजेडीला ५१, काँग्रेसला १४, माकपला एक; तर अपक्षांना तीन जागा मिळाल्या. शपथविधी कार्यक्रमास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, जुएल ओराम, अश्विनी वैष्णव आदी उपस्थित होते. उत्तर प्रदेश, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, गुजरात, छत्तीसगड आणि उत्तराखंडसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही कार्यक्रमास हजर होते.
Chandrababu Naidu: आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच; चंद्राबाबू नायडू यांची मोठी घोषणा
चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी

अमरावती : तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जनसेना पक्षाचे प्रमुख, अभिनेते पवन कल्याण, नायडू यांचे पुत्र नारा लोकेश यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नझीर यांनी मंत्र्यांना शपथ दिली.
या समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत आणि चिरंजीवी यांनीही सोहळ्याला हजेरी लावली.
२६ जणांच्या मंत्रिमंडळात तेलगू देसम पक्षाव्यतिरिक्त तीन मंत्रिपदे जनसेना पक्षाला आणि एक मंत्रिपद भाजपला देण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूकही पार पडली. ‘एनडीए’आघाडीने विधानसभेच्या एकूण १७५ जागांपैकी १६४ जागा जिंकल्या; तर लोकसभेच्या २५ जागांपैकी २१ जागा जिंकल्या.

खांडू अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री

इटानगर : पेमा खांडू सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली. एका बैठकीत खांडू यांची भाजप आमदारांनी नेता म्हणून निवड केली, अशी माहिती ज्येष्ठ नेते तरुण चुग यांनी दिली. भाजपचे केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि तरुण चुग या बैठकीस उपस्थित होते.

Source link

andhra pradesh cmchandrababu naiduMohancharan majhinda govtodisha cm bjpPM Modi
Comments (0)
Add Comment