हायलाइट्स:
- महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक
- केंद्र सरकारच्या विरोधात आघाडीची एकजूट
- बंदमध्ये सहभागी होऊ नका; भाजपचे आवाहन
अहमदनगर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर मधील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीतर्फे सोमवारी (११ ऑक्टोबर) बंद पुकारण्यात आला आहे. बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. या बंदला भाजपचा मात्र उघड विरोध आहे. या बंदमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सहभागी होऊ, नये असे आवाहनच आता भाजपतर्फे करण्यात आले आहे.
भाजपाचे नगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी जिल्ह्यातील व्यापारी आणि शेतकऱ्यांना हे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याखंड झाले होते. तसेच मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. ही घटना महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. बंद पुकारणाऱ्या पक्षांकडून शेतकऱ्यांवर सतत अन्याय झाला आहे. सध्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊनही या सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही. उलट थकीत बिलांच्या पैशासाठी शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. जळालेली रोहित्र बदलून मिळत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीच्या बंदमध्ये सहभागी होऊ नये,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
व्यापाऱ्यांना आवाहन करताना मुंडे यांनी म्हटले आहे, ‘गेली दोन वर्षे करोनाने हैराण झालेल्या व्यापाऱ्यांना आता कोठे पूर्ण वेळ दुकाने उघडी ठेवून व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली आहे. तोटा भरून काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सणासुदीच्या दिवसात व्यवसाय सावरत आहेत. अशातच बंद पुकारण्यात आल्याने पुन्हा व्यावसायाला खीळ बसणार आहे. व्यावसाय वाढीला चालना देण्याऐवजी बंदमध्ये सहभागी करून घेत व्यापाऱ्यांचे नुकसान केले जात आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊ नये,’ असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.
‘सध्या दररोज या सरकारच्या मंत्र्यांवर होणारे आरोप आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. महाराष्ट्रात रोज बलात्काराची प्रकरणे समोर येत आहेत. या मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटविण्यासाठी हा बंद पुकारण्यात येत आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी न होता त्रास देणाऱ्या आघाडी सरकारचाच निषेध करावा. सक्तीने बंद ठेवण्याचा प्रयत्न झाला तर त्यावरूद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत,’ असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे.