राज्य सरकारने जगन्नाथ मंदिराचे बंद असलेले ३ दरवाजे पुन्हा उघडले आहेत. मंदिराला असलेले ४ दरवाज्यांपैकी ३ दरवाजे करोना काळापासून बंद होते. आजपासून जगन्नाथाच्या भत्कांसाठी हे ३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. भाजपने विधानसभा निवडणुकीत सत्ता आल्यानंतर मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री मोहन माझी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी जगन्नाथाच्या दर्शनासाठी आले आणि मंगळ आरतीसह मंदिराचे सर्व दरवाजे उघडण्यात आले. यावेळी भाजपचे पुरीचे खासदार संबित पात्रा देखील उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंदिराच्या विकासासाठी ५ कोटीचा निधी मंजर केल्याचे सांगितले.
माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकारने करोना काळात मंदिराजे ३ दरवाजे बंद केले होते. ज्याचा उद्देश गर्दी कमी करण्याचा होता. करोनानंतर फक्त मंदिराचे सिंह द्वार सुरू ठेवण्यात आले. तर अश्व द्वार, व्याग्र द्वार आणि हस्ति द्वार गेल्या ५ वर्षांपासून बंदच आहेत. यामुळे मंदिरात दर्शनासाठी मोठी आणि लांब रांग लागत असे.
जगन्नाथ मंदिराच्या चार द्वारांची गोष्ट
सिंह द्वार- जगन्नात मंदिराचे चार द्वार चार दिशेला आहेत. हे चारही दरवाजे प्राण्यांच्या नावाने आहेत. पूर्व दिशेला असलेले द्वार हे सिंह द्वार म्हणून ओळखले जाते. मंदिरात प्रवेश करण्यासाठीचे हे मुख्य द्वार आहे. यालाच मोक्ष द्वार देखील म्हटले जाते.
व्याघ्र द्वार- या द्वाराचे नाव वाघाच्या नावाने असून हे आकांक्षाचे प्रतिक मानले जाते. हे द्वार पश्चिम दिशेला आहे. या द्वारातून संत आणि खास भक्त प्रवेश करतात.
हस्ती द्वार- नावावरूनच हे द्वार हत्तीवरून असल्याचे समजते. हे द्वार मंदिराच्या उत्तर दिशेला आहे. हत्तीला धनाची देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. हत्ती लक्ष्मीचे प्रतीक आहे. या द्वाराच्या दोन्ही बाजूला हत्तीची प्रतिकृती होती जे मुगल काळात तोड्याचे प्रयत्न झाले.
अश्व द्वार– जगन्नाथ मंदिराच्या दक्षिण दिशेला असलेल्या या द्वाराचे प्रतिक घोडा आहे. याला विजय द्वार देखील म्हटले जाते. विजयाच्या इच्छेसाठी योद्धा या द्वाराचा वापर करत असत.