गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक तसेच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह अनेक सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये त्यांना जम्मू-काश्मीर मधील दहशतवाद विरोधी कारवाईची माहिती देण्यात आली. जम्मू-काश्मीर मधील या एकापाठोपाठ घडणाऱ्या दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही चर्चा केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करणे,तसेच दहशतवाद विरोधी कारवाई करणाऱ्या अभियानांचाही त्यांनी आढावा घेतला. या बैठकीमध्ये त्यांनी दहशतवाद विरोधी कारवाईसाठीची तमाम यंत्रणा तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांचेकडूनही परिस्थितीचा आढावा घेतला व स्थानिक प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला.
विरोधकांकडून टिकास्त्र
९ जूनपासून सुरु झालेली ही दहशतवादी घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नव्हती. या दहशतवादी हल्ल्यांवर पंतप्रधान मौन असल्याबद्दल काँग्रेसकडून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले होते. काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधान मोदी शुभेच्छा स्विकारण्यात व्यस्त आहेत अशी जहरी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर मोदींची ही आढावा बैठक दहशतवाद विरोधी घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महत्वाची मानले जात आहे.
एकापाठोपाठ एक घडलेल्या दहशतवादी घटना
या मालिकांमध्ये पहिली घटना ही ९ जून मध्ये घडली. जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे भाविकांना घेवून जाणाऱ्या एका बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये बसचा चालक गोळीबाराचा शिकार झाल्याने ही बस दरीत कोसळली. या अपघातात ९ भाविकांचा दु:खद मृत्यु झाला तर ४२ जण जखमी झाले.यानंतर ११ जून रोजी रात्रीच्या सुमारास पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या कठुआ येथील सैदा सुखल गावामध्ये दोन दहशतवादी घुसले. गावकऱ्यांचा दरवाजा वाजवून त्यांनी त्यांच्याकडे पाणी मागितले. गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. तोच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक गावकरी गंभीर जखमी झाला.
११ जून रोजी रात्री जम्मूतील डोडा येथे दहशतवाद्यांचा तिसरा हल्ला झाला. यात दहशतवाद्यांनी डोडा येथील राष्ट्रीय रायफल आणि पोलिसांच्या चेकपोस्टवर हल्ला केला. यामध्ये ५ जवान व एक पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाले. १२ जून रोजी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी चौथी घटना समोर आली. जम्मुतील डोडा येथील गंडोह मध्ये दहशतवादी व सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यामध्ये स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा (SOG) एक हवालदार फरीद अहमद जखमी झाले. त्यांना तात्काळ डोडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये आजवरच्या तुलनेत विक्रमी मतदान झाले होते.त्यापार्श्वभूमीवर होणारे हे हल्ले देशासाठी चिंताजनक आहेत.