जळगाव: जिल्हा पोलिस दलातील १२८ रिक्त पदांसाठी शिपाई पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा शनिवारी झाली. परीक्षेनंतर दोन तासांतच उत्तरपत्रिका संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली असून,व्हॉट्सॲपच्या माध्यमातून गैरप्रकार करणारे दोन मुन्ना भाई (परीक्षार्थी) पोलिसांनी गजाआड करीत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.जिल्हा पोलिस दलातर्फे १२८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून,भुसावळ आणि जळगाव अशा दोन तालुक्यांतील ६४ केंद्रांवर शंभर गुणांची लेखी परीक्षा न्यासा कम्युनिकेशन कंपनीमार्फत घेण्यात आली. कोरोना निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करून पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील केंद्रावर रूम नंबर ५ मध्ये परीक्षार्थी योगेश रामदास आव्हाड (वय २७, रा. पांझण देव नागापूर, ता. नांदगाव, जि. नाशिक) याने अँड्राइड मोबाईलद्वारे व्हॅाट्सॲपच्या माध्यमातून प्रश्न पाठवून त्याची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे पर्यवेक्षकांच्या लक्षात आले. त्याच्याविरुद्ध पाळधी (ता. धरणगाव) दूरक्षेत्र पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या घटनेत विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी प्रतापसिंग गुलचंद बालोद याला ताब्यात घेण्यात आले. जळगाव तालुका पोलिसांत रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.परीक्षेवर देखरेख करणाऱ्या कॉन्स्टेबला संशय आल्यामुळे तपासणी केली. त्यावेळी त्याच्या कानामध्ये अत्यंत छोट्या आकाराची मायक्रोचिप असल्याचे पोलिसांना आढळून आले. शिवाय, त्याने पायाला डेबिट कार्ड च्या एका बाजुस एक ब्लूटूथ डिव्हाईस बसवले होते. या यंत्राच्या माध्यमातून फोन रिसीव्ह करण्याची सोय उपलब्ध होती. या मायक्रोचिपच्या माध्यमातून प्रताप सिंगचा मित्र त्याला प्रश्नांची उत्तर सांगणार होता. पण पेपर सुरू होण्याच्या आधीच सदर प्रकार उघड झाला.