गेल्या चार दिवसांत रायसी, कठुआ आणि दोडा जिल्ह्यांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नऊ यात्रेकरूंचा आणि एक केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानाचा मृत्यू झाला असून सात सुरक्षारक्षकांसह अन्य जखमी झाले आहेत. कठुआ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन संशयित पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यावेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला होता.
एका महिलेने दोघा व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींबाबत कळवल्यानंतर जम्मूच्या बाहेरील नरवाल बायपास परिसरात राबवलेल्या शोधमोहिमेत पोलिसांसह निमलष्करी दलाचे अधिकारीही सहभागी झाले होते. लष्कर, पोलिस आणि निमलष्करी दलाने गंडोह, चट्टागल्ला आणि दोडा जिल्ह्यातील लगतच्या परिसरात गुरुवारी सकाळी शोधमोहिमेला पुन्हा सुरुवात केली. याच ठिकाणी मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिसांसह सात सुरक्षारक्षक जखमी झाले होते. पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा समजू शकलेला नाही.
पोलिसांनी बुधवारी दोन दहशतवादी हल्ल्यांत सहभागी झालेल्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे जाहीर केली आणि त्यांची माहिती सांगणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. रविवारी रायसी जिल्ह्यात यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याचे रेखाचित्र पोलिसांनी जाहीर केले असून त्याची माहिती सांगणाऱ्यालाही २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
रायसी तसेच, राजौरी जिल्ह्यातील लगतच्या भागातही शोधमोहीम सुरू आहे. दहशतवाद्याच्या रेखाचित्राशी साधर्म्य असलेल्या एका व्यक्तीला रायसीतील बसमधून ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राजौरीतील नौशेरा आणि पूंछ जिल्ह्यातही शोधमोहीम सुरू आहे. कठुआ, सांबा आणि जम्मू जिल्ह्यांतील सुरक्षा दलांना दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याबाबत गुप्तचर संस्थांकडून सतर्क करण्यात आले आहे.
‘भाडोत्री सैनिकांद्वारे शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न’
दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक आर. आर. स्वेन यांनी गुरुवारी पाकिस्तान भाडोत्री सैनिकांद्वारे शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत भारतीय सैन्य त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. ‘शत्रूसाठी काम करणाऱ्यांना दहशतवादाला समर्थन देण्याच्या आपल्या निर्णयाचा पश्चाताप होईल. ते त्यांचे कुटुंब, जमीन आणि नोकऱ्या पणाला लावत आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे गमावण्यासारखे काहीही नाही,’ असा इशाराही स्वेन यांनी दिला.
‘जम्मू आणि काश्मीरच्या दहशतवादाचा प्रारंभबिंदूच सीमेपलीकडे आहे. काश्मीरमधील शांततापूर्ण वातावरण बिघडवण्यासाठी स्थानिकांना विध्वंसक कारवायांसाठी प्रवृत्त करू शकत नसल्याने ते त्यांच्या पाकिस्तानी नागरिकांना तिथे भरती करून त्यांना जबरदस्तीने येथे घुसवण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू आहे,’ असे स्वेन यांनी रियासी येथे पत्रकारांना सांगितले. ‘शत्रूसाठी काम करणारे पैसे आणि अंमली पदार्थांसाठी परदेशी दहशतवाद्यांना मदत करत आहेत. त्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. परदेशी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले जाईल आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर पश्चाताप करण्याची वेळ येईल,’ असा इशारा पोलिस महासंचालकांनी दिला.