जम्मू-काश्मीर व लडाख भारताचेच! अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करणाऱ्या चीन-पाकला भारताने खडसावले

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : काश्मीरच्या मुद्द्यावर भारताच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करणाऱ्या चीन व पाकिस्तानला भारताने गुरुवारी फटकारले. काश्मीर प्रश्नावर संयुक्त निवेदन काढणाऱ्या या दोन्ही देशांना ‘जम्मू-काश्मीर व लडाख भारताचेच’ असे खडे बोल सुनावले आहे.

पाकिस्ताने अध्यक्ष शाहबाज शरीफ य़ांनी अलीकडेच चीनचा दौरा केला. या वेळी चीन व पाकिस्तानने संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. यामध्ये चीनने आपल्या जुन्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. ‘भारत-पाक द्विपक्षीय करारानुसार जम्मू-काश्मीरचा वाद शांततेने सोडवला जावा. जम्मू-काश्मीरचा वाद संयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ठराव आणि द्विपक्षीय करारांनुसार न्याय्य आणि शांततापूर्ण मार्गाने मार्गी लावावा’, अशी भूमिका या निवेदनात मांडण्यात आली होती. त्यावर गुरुवारी भारताने तीव्र आक्षेप नोंदवला.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. ‘चीन आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त निवेदनात करण्यात आलेल्या जम्मू आणि काश्मीर संदर्भातील अनुचित विधानांचा आम्ही तीव्र निषेध करतो. भारत आपल्या भूभागांवरील पाकिस्तानचा बेकायदेशीर कब्जा कायदेशीर करण्याच्या इतर देशांच्या प्रयत्नांना विरोध करतो आणि नाकारतो. जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग आहेत व राहतील. या मुद्द्यावर भाष्य करण्याचा इतर कोणालाही अधिकार नाही,’ असे भारताने म्हटले आहे.

‘पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांच्या नुकत्याच झालेल्या चीन दौऱ्यानंतर चीन आणि पाकिस्तानने जारी केलेल्या संयुक्त निवेदनातील जम्मू-काश्मीरचा संदर्भ भारताला अमान्य आहे. चीनसह इतर देश भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करणार नाहीत आणि भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करतील, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो,’ असेही भारताने म्हटले आहे. ‘सन १९४७पासून पाकिस्तानने बेकायदा बळकावलेल्या काश्मीरच्या भारतीय भूभागातील चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर हा प्रकल्प भारताला चिंताजनक वाटतो,’ अशी भूमिकाही भारताने मांडली आहे.

जिनपिंग यांचे शुभेच्छांबाबत मौन

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी त्यांचे अभिनंदन केले. मात्र, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मौन बाळगले. याबाबतची चर्चा जगभरातील माध्यमांमध्ये रंगली. त्यावर चीनने सारवासारव करताना म्हटले, की जिनपिंग हे चीनचे अध्यक्ष आहेत आणि मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. अशा परिस्थितीत त्यांचे चिनी समकक्ष (पंतप्रधान) ली कियांग ली यांनी मोदी यांचे अभिनंदन केले आहे.



Source link

india chinaIndia-PakistanJammu-Kashmir and Ladakhjammu-kashmir ladakhMinistry of External Affairsshahbaz sharif
Comments (0)
Add Comment