मृतदेह जलदगतीने मायदेशी
भारतातील; तसेच परदेशातील अनिवासी भारतीयांच्या समस्या सोडवण्यासाठी सन १९९६मध्ये केरळ सरकारने ‘नोरका’ विभागाची स्थापना केली होती. कुवेतमध्ये लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या केरळमधील कामगारांचा आकडा वाढून गुरुवारी दुपारपर्यंत २४वर गेल्याची माहिती ‘नोरका’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कोलासेरी यांनी दिली. ‘नोरका’ मदत कक्ष कुवेतमधील भारतीय दूतावास; तसेच तेथील रुग्णालयांमधील शवागारांच्या संपर्कात असून, मृतदेह जलदगतीने मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बेकायदा इमारतींची पाहणी
कुवेतमधील मांगफ, अहमदी गव्हर्नरेट येथील सात मजली इमारतीत बुधवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ४९ परदेशी कामगारांचा मृत्यू झाला असून, अन्य ५० जण जखमी झाले आहेत. यापैकी ४८ मृतदेहांची ओळख पटवण्यात आली. यात ४५ भारतीय आणि तीन फिलिपिन्सच्या नागरिकांचा समावेश आहे. उर्वरित एका मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या इमारतीत १९६ परदेशी कामगार राहत होते. या घटनेनंतर कुवेतमध्ये बेकायदा इमारतींची पाहणी सुरू करण्यात आली आहे.
हवाई दलाचे विमान सज्ज
नवी दिल्ली : कुवेतमधील भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांच्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात येत असून, त्यांचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी हवाई दलाचे विमान सज्ज आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. जखमी भारतीयांच्या मदतीवर देखरेख करण्यासाठी; तसेच भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणण्याची प्रक्रिया जलदगतीने व्हावी, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह कुवेतमध्ये दाखल झाले. सिंह यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या भारतीय जखमींची भेट घेतली.
कुवेतची सहकार्याची ग्वाही
दुबई : परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी कुवेतचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांची भेट घेतली. जखमींना वैद्यकीय उपचार, मृतदेहांची पाठवणी यांसाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती कुवेतमधील भारतीय दूतावासाने ‘एक्स’वरून दिली. या आगीच्या घटनेची जलदगतीने चौकशी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
केरळ सरकारची पाच लाखांची मदत
तिरुअनंतपुरम : कुवेतमधील आगीत प्राण गमावलेल्या केरळमधील श्रमिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केरळ सरकारने केली. मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. जखमींवर उपचार व मृतदेह मायदेशी आणण्याच्या प्रक्रियेचा समन्वय साधण्यासाठी केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांना कुवेतला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह कुवेतमध्ये दाखल.
– कुवेत प्रशासनाकडून आगीची चौकशी सुरू.
– मृतांमध्ये केरळमधील २४ कामगारांचा समावेश.