दीक्षा तिवारी असं मृत तरुणीचं नाव आहे. ती मूळची बरेलीची रहिवासी आहे. कानपूर वैद्यकीय महाविद्यालयातून ती एमबीबीएस उत्तीर्ण झाली होती. मेरठमध्ये तिला पोस्टिंग मिळालं होतं. याचाच आनंद साजरा करण्यासाठी दीक्षा तिचे दोन मित्र, हिमांशु आणि मयंक यांच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये गेली होती. यानंतर ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमच्या इमारतीच्या गच्चीवर गेली होती.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षा जिथे बसली होती, तो भाग मोडून खाली कोसळला. सहकारी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री शेवटच्या वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही आधी खोलीत पार्टी केली. त्यानंतर आम्ही एग्झामिनेशन बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर गेलो. रात्री १२ ते १ दरम्यान आम्ही छतावर होतो.
दीक्षा बोलता बोलता गच्चीवर तयार करण्यात आलेल्या डक्टवर (व्हेंटिलेशनसाठी तयार करण्यात आलेली जागा) बसली. दीक्षा मित्रांशी बोलत असताना डक्टचा काही भाग मोडून खाली पडला. दीक्षा सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळली. त्यानंतर एक विद्यार्थी लगेचच पाईपनं खाली आला. तेव्हा त्याला दीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.
वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दीक्षा पार्टी करुन गच्चीवर गेली होती. तेव्हा तिच्यासोबत २ मित्र होते. दीक्षा अचानक खाली कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती सहपोलीस आयुक्त हरिश्चंद्र यांनी दिली. दीक्षाची हत्या झाल्याचा तिच्या भावाचा आरोप आहे. पोलिसांनी दीक्षाच्या दोन्ही मित्रांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरु आहे.