हायलाइट्स:
- कोकणालाही पावसाने झोडपून काढलं
- चिपळूण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
- नदीला पुन्हा पूर येण्याची भीती
रत्नागिरी : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहेत. कोकणालाही पावसाने झोडपून काढलं असून चिपळूण तालुक्यात शिरगाव व पोफळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे शिरगावच्या वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शिरगाव पोफळी परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. घाटातील डोंगर-दऱ्यांत मुसळधार पाऊस पडल्यामुळे शिरगावच्या वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आणि काही क्षणात पूरपरिस्थिती निर्माण झाली.
नदीने रूद्र रूप धारण केल्याने तात्काळ शिरगाव पोलीस प्रशासनाने दखल घेत नदीच्या पुलावरील वाहतूक बंद केली.
दुसरीकडे, कुंभार्ली घाटातील एका वळणावर दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र पोलीस आणि ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.