जामनेर : पब्जी (PUB-G) मोबाइल गेमच्या वेडापायी अनेक मुलांनी जीव गमावला आहे. दरम्यान, जामनेर शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जामनेर शहरातील दत्त मंदीर परिसरातील जहागीरदार वाडा येथील १९ वर्षीय तरुणीने पब्जी गेमच्या वेडापायी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. नम्रता पद्माकर पाटील (वय-१९) असे या मृत तरुणीचे नाव असून ती बारावीचे शिक्षण घेत होती. याबाबत जामनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, जामनेर शहरातील जहागीरदार वाडा येथील नम्रता पाटील ही आपल्या कुटुंबियांसह सोबत जैन डॉक्टर यांच्या घरात राहतात. आज १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी वडील पद्माकर खोडके(पाटील) मूळ रा.भराडी हे बाहेर गेले होते तर आई सांयकाळी वाकी रोडवरील घराच्या चालू असलेल्या बांधकामावर पाणी मारण्याच्या कामानिमित्त गेल्या होत्या. यावेळी नम्रता ही पब्जी गेम खेळत असताना एका लेव्हल पर्यंत आली. व त्यावेळी तिने घरातील पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली.
सोबत आत्महत्या करण्यापुर्वी तीने सुसाईड नोट लिहून दिली असून “मी माझ्या मर्जीने आत्महत्या करीत असून यामध्ये माझ्या घरच्यांचा कोणाचाही दोष नसल्याचा उल्लेख केला आहे. नम्रता पाटील ही नेहमी मोबाईलवर गेम खेळत असायची अशी माहिती घरच्यांकडून मिळाली.