RSS Chief Mohan Bhagwat : ‘अहंकारावरुन’ कान टोचताच..भाजपचा एक मोठा चेहरा सरसंघचालकांच्या भेटीला

लखनऊ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या लोकसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांबद्दल केलेल्या वक्तव्याला काही दिवस लोटले असतानाच भाजपच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात राजकीय धक्याला सामोरे गेलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरसंघचालकांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकांतील भाजपच्या प्रदर्शनावर व पुढील योजनांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकांवर भाष्य केले होते. नागपूर मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्यात संबोधित करताना त्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षातील नेत्यांच्या अहंकारासंबंधी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा करण्यात आली. आपल्या भाषणात ते म्हणाले होते की,”जो सच्चा सेवक असतो तो कधीच अहंकारी नसतो. तो कार्य करताना मर्यादेचे पालन करतो. त्याच्यात ही गोष्ट मी केली असा अहंकार नसतो. तोच खरा सेवक म्हणण्यास पात्र असतो.” यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मर्यादांचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. भाजपच्या ४०० पारच्या दाव्याचे पानिपत होवून लोकसभा निवडणुकीतील खराब प्रदर्शना नंतर आलेल्या या वक्तव्याबद्दल अनेक कयास लावले जात आहेत. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १५ जून रोजी सरसंघचालकांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्येही भाजपला मोठा फटका बसलेला आहे.
मनमोहन, अडवाणी, अँटनी; सगळ्यांचे रेकॉर्ड मोडणार मोदींचे मंत्री; नेहरुंचा विक्रम राहणार अबाधित

हे विधान मोदींना उद्देशून ?

लोकसभा निवडणूकीत स्वबळावर ४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपला बहुमतासाठी आवश्यक जागा मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागला. लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी केवळ २४० जागा भाजपच्या पदरात मतदारांनी टाकल्या. भाजपच्या ४०० पारला आव्हान देत उभ्या राहिलेल्या इंडिया आघाडीने यावेळी मोदीलाटेला अडविले. परिणामी भाजपला एनडीएतील जेडीयु आणि आणि टीडीपी या मित्रपक्षांना गोळा करुन युतीचे सरकार स्थापन करावे लागले. यात भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश मध्येही भाजपला मोठा फटका बसला होता. भाजपने मोदींच्या चेहऱ्यावर लोकसभा निवडणुकांत केलेला गाजावाजा पाहता सरसंघचालकांनी हे विधान भाजपसह मोदींना उद्देशून केल्याचे म्हटले जात होते.

उत्तर प्रदेश मधील भाजपचा घसरता आलेख

उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा भाजपला मोठ्या धक्क्याचा सामना करावा लागला. तेथील एकूण ८० जागांपैकी भाजपला केवळ ३३ जागा जिंकता आल्या.२०१९ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये इथे भाजपने ६२ जागा काबीज केल्या होत्या. हिंदुत्वाच्या जोरदार प्रचाराने उत्तर प्रदेश भाजपने बांधला असल्याचे म्हटले जात होते. परंतु जनमताने भाजपचा विजयाचा आलेख खाली आणला. भाजपचे हिंदुत्ववादी राजकारणाचे केंद्र असलेल्या अयोध्येतही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. परिणामी या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेससह इंडिया आघाडीच्या बॅनरखाली 44 हून अधिक जागी उमेदवार विजयी झाले. यात समाजवादी पक्ष ३७ जागांवर विजयी होत तिथला प्राबल्याचा पक्ष ठरला.

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट भाजपच्या लोकसभेतील खराब प्रदर्शनाची तसेच आगामी संघटनवाढीसाठी सामाजिक व राजकीय रणनितीचा आढावा घेणारी असू शकते. भागवत सध्या उत्तर प्रदेशमधील विविध भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरांमध्ये मार्गदर्शन करत आहेत. गुरुवारी त्यांनी वाराणसी,गोरखपूर,कानपूर सह अवध भागातील २८० स्वयंसेवकांना संघाच्या सामाजिक व राजकीय उपक्रमांच्या वाढीसाठी मार्गदर्शन केले. तसेच संघाच्या शाखा व संघटन वाढीचा संकल्प व्यक्त केला.



Source link

bjpLok Sabha electionsmohan bhagwat meetingRSS chief Mohan Bhagwatutter pradeshउत्तर प्रदेश निवडणूकमोहन भागवत भेटयोगी आदित्यनाथराष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Comments (0)
Add Comment