आपल्या उज्वल भविष्याचे स्वप्न घेऊन श्रीहरी हा कुवेतमध्ये कार्यरत होता. पण मंगाफ येथे लागलेल्या आगीने त्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. श्रीहरीचे वडील हातावर असलेल्या टॅटूवरुन आपल्या मृत मुलाची ओळख पटवू शकले आहेत. ओळख पटताच त्याच्या वडिलांनी हंबरडा फोडला होता.
‘पार्थिवाची ओळख पटवण्यासाठी अधिकाऱ्यांचा फोन आला होता. मी जेव्हा तेथे गेलो तेव्हा माझ्या मुलाचा संपूर्ण चेहरा जळला होता. मी त्याला ओळखूच शकलो नाही. मग मी अधिकाऱ्यांना सांगितलं की, त्याच्या हातावर एक टॅटू आहे. तो दिसताच मी त्याला ओळखू शकलो.’ त्याच्या वडिलांनी दु:खाचा आवंढा गिळत माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
बापलेक एकाच कंपनीसाठी काम करत होते. तर वडील गेले ८ वर्ष कुवेतमध्ये कार्यरत होते. टीव्हीवरुन बातमी समजताच वडील प्रदीप यांनी त्याच्या कुटुंबीयांना हे वृत्त कळवले. श्रीहरीच्या मित्रांनी माध्यमांना सांगितले की, तो आठवडाभरापूर्वीच केरळ मध्ये येऊन गेला होता आणि आता अनपेक्षितपणे त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली.
श्रीहरी हा कुवेतधील एका सुपरमार्केट मध्ये काम करत होता. जोपर्यंत त्याला मॅकॅनिकल इंजिनीअर या शैक्षणिक पात्रतेनुसार काम मिळत नाही. पण त्याचे स्वप्न या दुर्घटनेने भंगले आहे.
केरळ सरकारने गुरुवारी २३ मल्याळी लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. कुवेत मधील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इमारतीत घडलेल्या या अग्नितांडवात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४० भारतीयांचा समावेश आहे. आणि ५० जण जखमी आहेत. मंगाफ येथील इमारतीच्या किचनमध्ये आग भडकली आणि ती संपूर्ण इमारतीत पसरली. आणि इमारतीतील सर्व पुरुष रहिवासी झोपले होते. पसरलेल्या धुरामुळे त्यांचा श्वास गुदमरला आणि ते मृत्यूच्या दाढेत सापडले.