रजनीथ आपल्या गृहप्रवेशाची पूजा आटोपून दीड वर्षांपूर्वीच कुवैतमध्ये नोकरीसाठी रुजू झाला होता. तर जुलैमध्ये आपली सुट्टी घालवण्यासाठी स्वगृही परतणार होता. परंतु त्याच्या अनपेक्षित मृत्यूच्या बातमीने त्याच्या प्रियजनांना मोठा धक्का बसला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुवेतमध्ये बांधकाम मजूर राहात असलेल्या इमारतीला बुधवारी पहाटे ४.३०च्या सुमारास आग लागली होती. सदर इमारतीत १९५ मजूर राहत असल्याची माहिती तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली होती. इमारतीच्या स्वयंपाक घरात आग लागली आणि वाढत गेल्याने ही मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले होते. ज्यामध्ये आता ४५ पेक्षा जास्त मजूरांचा मृत्यू झाल्याचे समजते.
मृत मजूरांमध्ये जीव गमावलेला रजनीथ हा दयाळू स्वभावाचा मेहनती तरुण होता. तसेच त्याच्या कुटुंबीयांसाठी आशेचा किरण होता. त्याच्या कुटुंबीयांनी आतापर्यंत त्याच्यासाठी मोठे कष्ट उपसले होते. कुटुंबीयांच्या जगण्याची आशा आता मावळल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
रजनीथने स्वत:च्या कष्टाने आपल्या स्वपनांचे घर उभारले होते. या घराचा दीड वर्षांपूर्वी गृहप्रवेश समारंभ पार पाडून तो कुवैतला रवाना झाला होता. आणि तो जुलैमध्ये सुट्टीसाठी येण्याच्या तयारीत देखील होता, असे त्याच्या शेजाऱ्याने एका माध्यमाशी संवाद साधताना सांगितले आहे.
कुवेत मधील मंगाफ येथे घडलेल्या अग्नितांडवात आतापर्यंत ४९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सुमारे ५० जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. आगीच्या कचाट्यात जीव गमावलेल्या मृतांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाचे विमान रवाना झाले होते. ४५ मृतांचे पार्थिव या विशेष विमानाने १४ जूनला सकाळी कोचीत पोहोचले आहे. केंद्रीय मंत्री किर्तीवर्धन सिंह यांनी याबद्दल माहिती दिली आहे.