तपास एजन्सीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आदेश जारी केला होता, त्यानंतर १२१ एकर जमीन आणि ग्लोकल युनिव्हर्सिटीची इमारत जप्त करण्यात आली आहे. ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, या मालमत्ता अब्दुल वाहिद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर नोंदणीकृत आहेत, ज्याचे नियंत्रण मोहम्मद इक्बाल आणि त्याच्या कुटुंबीयांकडे आहे.
अवैध खाण प्रकरणाशी संबंधित कारवाई
मोहम्मद इक्बाल, ट्रस्ट आणि त्यांच्या कुटुंबियांवर करण्यात आलेली ही कारवाई अवैध खाण प्रकरणाशी संबंधित आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार सध्या फरार आहे. तो दुबईत असल्याची माहिती आहे. मोहम्मद इक्बाल यांना चार मुलं आहेत. त्याच्या तुरुंगात असलेल्या मुलांवर आणि भावावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
हे मनी लाँड्रिंग प्रकरण उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या वाळू उत्खनन, लीजचे बेकायदेशीर नूतनीकरण आणि अनेक खाण लीजधारक, काही अधिकारी आणि अज्ञात लोकांविरुद्ध दिल्लीत सीबीआय एफआयआरशी संबंधित आहे. सर्व खाण कंपन्या मोहम्मद इक्बाल ग्रुपच्या मालकीच्या होत्या. सहारनपूर आणि आजूबाजूच्या परिसरात या कंपन्या मोठ्या प्रमाणावर अवैध खाणकाम करत होत्या.
आयटीआर (इन्कम टॅक्स रिटर्न) मध्ये नाममात्र उत्पन्न दाखवूनही, खाण कंपन्या आणि मोहम्मद इक्बालच्या समूहाच्या कंपन्यांमध्ये कोणतेही व्यावसायिक संबंध नसताना कोट्यवधींचे व्यवहार आढळून आले आहेत, असंही ईडीने सांगितलं आहे.