हायलाइट्स:
- महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक
- व्यापाऱ्यांनी आक्रमकपणे दर्शवला विरोध
- मात्र ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’चा बंदला जाहीर पाठिंबा
मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ३ पक्षांनी पुकारलेल्या या बंदला विविध शहरांतील व्यापाऱ्यांनी मात्र आक्रमकपणे विरोध दर्शवला आहे. तर ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’ने या बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे.
‘करोनातून आताच सर्व व्यापारी आणि उद्योजक कुठेतरी जेमतेम बाहेर पडत आहेत आणि सणासुदीच्या काळात अचानकपणे बंद करणे योग्य नाही. जी घटना उत्तर प्रदेशात घडली त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, त्याचे समर्थन कुणालाही करता येणार नाही. मात्र त्यासाठी आपण आंदोलन करा… मोर्चे काढा, पण संपूर्ण महाराष्ट्र बंद करू नका, बंद करून काय साध्य होणार?’ असा प्रश्न ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनकडून विचारण्यात आला आहे.
‘आतापर्यंत जे बंद झाले त्यास कधीही सरकारने दुजोरा दिला नाही. आता आपल्याच पार्टीचे सरकार आहे. तरी कृपया महाराष्ट्रातील तमाम जनतेला बंद करून वेठीस धरू नका. सरकार आपलेच आहे, पोलीसही आपलेच आहेत आणि बंद देखील आपल्याच सरकारमधील तिन्ही पक्षांनी केला आहे .आतापर्यंतच्या अनुभवानुसार सरकार बंद हाणून पाडते. परंतु ह्या खेपेस बंद पुकारणारेच बंदची अंमलबजावणी करणार? आम्ही दाद कोणाकडे मागायची? आधीच नुकसानग्रस्त असताना सगळ्यांना मदतीची गरज असताना बंद पुकारणे योग्य नाही. शेतकऱ्यांपासून लघुउद्योग, व्यापारी व ज्यांचे हातावर पोट आहे या सर्वांना नुकसान भरपाई कोण देणार?’ असा उद्विग्न सवालही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनकडून उपस्थित करण्यात आला आहे.
मुंबईच्या डबेवाल्यांचं काय आहे म्हणणं?
‘उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा मुंबई डबेवाला असोसिएशन निषेध करत आहे. भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने त्याची कार आंदोलक शेतकऱ्यांवर चढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री तिथे आपला मुलगा नव्हता असा दावा करत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरण वाढत असल्याचे पाहून या मंत्रीपुत्रावर गुन्हा दाखल केला आहे. पण ८ जणांचा मृत्यू झालेला असला तरी देखील म्हणावा तसा तपास पोलिसांनी केला नाही. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे. या महाराष्ट्र बंदला मुंबई डबेवाला असोसिएशन जाहीर पाठिंबा देत आहे,’ अशी भूमिका डबेवाल्यांच्या संघटनेकडून मांडण्यात आली आहे.