सावध राहा! कधी तरी तुमच्याच घरात कोणीतरी घुसेल; मलिक यांचा नीतेश राणेंना सल्ला

हायलाइट्स:

  • आर्यन खान प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच
  • नीतेश राणे यांना नवाब मलिक यांचं सणसणीत उत्तर
  • स्वत:चं घर सांभाळण्याचा दिला सल्ला

मुंबई: आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर टीका करणारे भाजपचे आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांना मलिक यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ‘कधी तरी तुमच्याच घरात कुणीतरी घुसेल आणि तुमचेच लोक तुरुंगात जातील,’ असा इशारा मलिक यांनी दिला आहे.

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीनं केलेल्या कारवाईवर नवाब मलिक सातत्यानं प्रश्न उपस्थित करत आहेत. ड्रग्ज पार्टीत भाजपशी संबंधित लोक होते. त्यांना सोडण्यात आलं. ज्या काही लोकांना अटक करण्यात आली, त्यांना एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे भाजपचे कार्यकर्ते होते, असा गौप्यस्फोट करत मलिक यांनी काही फोटो आणि व्हिडिओ पुरावेही सादर केले आहेत. त्यामुळं अस्वस्थ झालेल्या भाजपनं मलिक यांच्यावर टीका सुरू केली आहे. ‘सुशांतसिंह राजपूत हा हिंदू असल्यामुळं त्याच्या मृत्यूबाबत नवाब मलिक यांनी आवाज उठवला नाही. पण आर्यन खान मुस्लिम असल्यामुळं ते आता बोलत आहेत,’ असा आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.

वाचा: राहुल गांधींनी संजय राऊतांकडं बोलून दाखवली मनातली ‘ही’ खंत

नीतेश राणे यांच्या या टीकेला मलिक यांनी आज उत्तर दिलं. ‘नीतेश राणे जे बोलताहेत, तीच कारणं आहेत आर्यन खान यांना फसवण्याची. भाजपच्या लोकांनीच हे सगळं फ्रेम केलेलं आहे. ज्या पद्धतीनं आता भाजपचे नेते बोलतायत, त्यातून हेच सिद्ध होऊ लागलंय,’ असं मलिक म्हणाले. ‘भाजपवाले जेव्हा अडचणीत येतात तेव्हा धर्माची ढाल पुढं करतात. त्यांनी मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी इतकंच माझं म्हणणं आहे,’ असं मलिक म्हणाले.

भंगारच्या व्यवसायाचा अभिमान!

गोपीचंद पडळकर व मोहित कंबोज यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. या दोघांनीही मलिक यांच्या भंगारच्या व्यवसायाचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेचाही मलिक यांनी समाचार घेतला. ‘माझे वडील भंगारचा धंदा करायचे याचा मला अभिमान आहे. मी कधी कुणाला लुटलं नाही. मी बँकेचे पैसे बुडवले नाही. ज्यांच्यावर सीबीआयच्या धाडी पाडल्या ते माझ्या कुटुंबीयाचा धंदा काढत आहेत. मी भंगारचा धंदा करतो. पण आम्ही सोन्यात कुणाला बुडवले नाही, सोन्याची तस्करी केली नाही’, असा टोला त्यांनी कंबोज यांना हाणला.

वाचा: याला म्हणतात लढाई… संजय राऊत यांनी केलं प्रियंका गांधींचं कौतुक

Source link

Aryan Khan Drug CaseMumbai Drug CaseNawab Malik warns Nitesh RaneNCBनवाब मलिकनीतेश राणे
Comments (0)
Add Comment