गुरुवारी एका पत्रकारपरिषदेदरम्यान अमेरिकेचे अधिकृत युएस स्टेट प्रवक्ते मॅथ्यू मिल्लर यांनी नुकताच पार पडलेल्या भारतातील लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की,भारतात यशस्वीपणे पार पडलेल्या निवडणुकांबद्दल अमेरिका आनंद व्यक्त करते.
ही एक ऐतिहासिक निवडणूक
भारतातील निवडणुकांसंबंधी अमेरीकेच्या या भूमिकेवर एका पाकिस्तानी वार्ताहराने एक प्रश्न विचारला होता. यामध्ये त्याने असा दावा केला की,” नरेंद्र मोदी हे भारताला हिंदूराष्ट्रात परावर्तीत करीत आहेत. यामूळे भारतातील इतर धर्मात असुरक्षिता वाढत आहे.” यावर उत्तर देताना अमेरिकेचे प्रवक्ते मिल्लर म्हणाले की, “निवडणुकीतील मुद्दे यांवर भारतीय मतदार निर्णय घेतील. आम्ही फक्त भारतातील निवडणुकीचा आनंद साजरा करत आहोत.जगभरातील कोणत्याही देशाच्या इतिहासात झालेल्या निवडणुकांमधील ही एक ऐतिहासिक निवडणूक प्रक्रिया होती.” ते पुढे म्हणाले की,त्या निवडणुकांतील विशिष्ट निकालांविषयी आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देवू शकत नाही.
१२ लाख मतदान केंद्रांवर पार पडली मतदानाची प्रक्रिया
जगभरात चर्चेची ठरलेली भारतातील ही निवडणूक एकूण सात टप्प्यांमध्ये पार पडली.देशभरातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशामध्ये ही निवडणूक संपन्न झाली. भारतीय निवडणूक आयोग या संविधानिक स्वायत्त संस्थेने स्थापन केलेल्या १२ लाख मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये देशभरातील तब्बल ९६ लाख मतदारांनी मतदान केले. २०१९ साली ही संख्या ९१ करोड होती. या पाच वर्षांमध्ये या संख्येत पाच करोड मतदारांची वाढ झाली आहे.
भारतातील निवडणूक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय
देशभरातील एकूण ५४३ लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक झाली. यामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक २४० जागांवर विजय मिळाला. परंतु सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक २७२ जागांचे बहुमत कोणत्याच पक्षाला न मिळाल्याने भाजपप्रणित एनडीएने युतीचे सरकार स्थापन केले. या युतीच्या सरकारमध्ये नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीला अनेक शेजारी राष्ट्रांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामूळे भारतातील ही निवडणूक ही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे.