पोक्सोअंतर्गत गुन्ह्यात येडियुरप्पा यांना अटक करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने अटकाव केल्यानंतर दुसऱ्या दिवशी येडियुरप्पा हे बेंगळुरूमध्ये दाखल झाले. या प्रकरणी चौकशीसाठी येडियुरप्पा यांनी १७ जून रोजी सीआयडीसमोर हजर राहावे, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले होते.
‘मी आधी ठरलेल्या एका कार्यक्रमासाठी दिल्लीला गेलो होतो. मी १७ जूनला चौकशीसाठी हजर राहीन, असे मी आधीच लेखी कळवले होते. सीआयडीने मला अटक करू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. मी सोमवारी चौकशीसाठी हजर राहणार आहे. काहींनी या प्रकरणात उगाचच संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मला कोणालाही दोष द्यायचा नाही. सत्य काय आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. कट रचणाऱ्यांना लोक धडा शिकवतील,’ अशी प्रतिक्रिया येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
एका १७ वर्षीय मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून, येडियुरप्पा यांच्या विरोधात पोक्सो कायद्यासह भादंविअंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोप येडियुरप्पा यांनी फेटाळले आहेत.