ओडिशातील दोघांना श्रद्धांजली
भुवनेश्वर : ओडिशातील महंमद जहूर आणि संतोष कुमार गौडा या दोघांचे मृतदेह शनिवारी सकाळी भुवनेश्वरमध्ये दाखल झाले. उपमुख्यमंत्री के. व्ही. सिंह देव आणि प्रवती परिदा यांनी येथील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी दोघांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. ‘मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे,’ असे सिंह देव यांनी सांगितले. गौडा गंजम जिल्ह्यातील रानाझल्ली गावचे आणि जहूर कटक जिल्ह्यातील कराडपल्ली गावचे होते.
वीस दिवसांत गमावला मुलगा
रांची : महंमद अली हुसेन यांचे पार्थिव निवासस्थानी आणल्याने परिसरात शोककळा पसरली होती. ते मूळ रांचीमधील हिंदपिरी परिसरातील रहिवासी होते, असे एका अधिकाऱ्याने शनिवारी सकाळी सांगितले. त्यांचे पार्थिव दिल्लीहून रांची येथे आणले, त्या वेळी रांचीचे उपायुक्त राहुलकुमार सिन्हा बिरसा मुंडा विमानतळावर उपस्थित होते. अली (वय २४) तीन भावंडांमध्ये सर्वांत लहान होते; तसेच ते सुमारे २० दिवसांपूर्वीच कुवेत येथे गेले होते, असे त्याचे वडील मुबारक हुसेन (वय ५७) यांनी सांगितले. झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनीही अलीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला; तसेच त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
३३ वर्षांची मेहनत थांबली
कोलकाता : द्वारिकेश पटनाईक (वय ५२) यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळीच ताब्यात घेतले. या वेळी अग्निशमन मंत्री सुजित बोस आणि भाजप नेते अग्निमित्रा पॉल उपस्थित होते. त्यानंतर पटनाईक यांचे पार्थिव पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील त्यांच्या घरी नेण्यात आले. पटनाईक वयाच्या १९व्या वर्षी कुवेतला गेले होते. तेथे ते यांत्रिक पर्यवेक्षक म्हणून काम करीत होते.
अंत्यसंस्कार उद्या
होशियारपूर (पंजाब) : दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले हिंमत राय (वय ६२) यांचे पार्थिव शनिवारी येथे आणण्यात आले असू, ते सिंगरीवाला गावातील शवागारात ठेवण्यात आले आहे. त्यांचे कुटुंबीय परदेशातून काही नातेवाइक येण्याची वाट पाहत असल्याने त्यांच्यावर उद्या, सोमवारी (१७ जून) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राय यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली आणि एक अल्पवयीन मुलगा आहे.