देशातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन दुप्पट करणार
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारचे लक्ष बेरोजगारी कमी करण्यावर आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि नोकऱ्या निर्माण करण्यासाठी केंद्रसरकार योजना राबवणार आहे. केंद्रसरकार येत्या पाच वर्षांत देशातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील.भारताचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन पुढील ५ वर्षांत सुमारे $२५० अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
सध्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात २५ लाख लोक काम करतात
सध्या या क्षेत्रात २५ लाख लोक काम करत आहेत.तर येत्या पाच वर्षांत इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या दुप्पट करून ५० लाखांपर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की,’आमचा भर डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे सेवा देण्यावर आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहोत. तसेच आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आधीच प्रयत्न करत आहे. परंतु आता त्याला अधिक गती देण्याचे काम आम्ही करणार आहोत.”
देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक उत्पादनास प्रोत्साहन
दरम्यान,देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवत आहे. मोदी सरकारने यासाठी ७६० अब्ज रुपये दिले आहेत. आयातीच्या बाबतीत, भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये चीन आणि हाँगकाँगचा वाटा ४४ टक्के आणि १६ टक्के आहे. दुसरीकडे, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स (ECU) भारताच्या इलेक्ट्रॉनिक निर्यातीत आघाडीवर आहेत. अमेरिका आणि संयुक्त अरब अमिराती हे देश भारतातून इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची सर्वाधिक आयात करतात.