एलॉन मस्क यांचं विधान काय ?
एलॉन मस्क यांनी शनिवारी (१५ जून) आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊंटवर ईव्हीएम मशीनबाबत एक पोस्ट शेअर केली होती त्यात त्यांनी लिहिले होते की, ”आपण ईव्हीएम काढून टाकले पाहिजेत. सध्या मानवाद्वारे किंवा एआयद्वारे ईव्हीएम हॅक होण्याचा धोका कमी असला तरी भविष्यात जास्त निर्माण होईल” अशी पोस्ट एलॉन मस्क यांनी केली होती.
राजीव चंद्रशेखर यांचे उत्तर
यानंतर मस्क यांच्या पोस्टवर माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ”हे मोठे सामान्यीकरण आहे. याचा अर्थ असा आहे की कोणतेही सुरक्षित डिजिटल हार्डवेअर तयार केले जाऊ शकत नाही. हे चुकीचे आहे. एलॉन मस्क यांचा दृष्टीकोन यूएस आणि इतरत्र लागू होऊ शकतो, जिथे ते इंटरनेट-कनेक्ट मतदान यंत्रे तयार करण्यासाठी नियमित संगणक प्लॅटफॉर्म वापरतात. परंतु भारतीय ईव्हीएम हे वेगळ्या पद्धतीने तयार केले आहेत. भारतीय ईव्हीएम सुरक्षित आहेत. येथील ईव्हीएममध्ये इतर देशांच्या ईव्हीएमसारखी कोणतीही कनेक्टिव्हिटी किंवा वायफाय वापरले जात नाही.”
राहुल गांधी यांनी ईव्हीएमचा ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणून केला उल्लेख
एलॉन मस्क यांच्या वक्तव्यावर राहुल गांधींनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ”भारतातील ईव्हीएम हा एक ‘ब्लॅक बॉक्स’ आहे. कोणालाही त्याची चाचणी घेण्याची परवानगी नाही. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्या जात आहेत. जेव्हा संस्थांमध्ये जबाबदारी नसते तेव्हा लोकशाही धोक्याची बनते.”
राहुल गांधींनी रवींद्र वायकरांचा दिला दाखला
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये मिड-डे वृत्तपत्राचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भातील वादाचा उल्लेख आहे. नुकताच मुंबई पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पांडीलकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मतदान मोजणीच्या दिवशी (4 जून) रोजी मंगेश पांडीलकर मोबाईल फोन वापरताना दिसले होते. याच आरोपावरून पोलिसांनी मंगेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.