हायलाइट्स:
- महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचा गडचिरोली दौरा
- पोलिसांकडून चोख बंदोबस्त
- महाविकास आघाडी हा बंद शंभर टक्के यशस्वी करणार असल्याचा निर्धार
गडचिरोली : लखीमपुर हत्याकांडाविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी सोमवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने हा बंद शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा गडचिरोली दौरा असल्याने पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी सीआरपीएफच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आयोजित सायकल रॅली ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हिरवी झेंडी दाखविणार आहेत. ही रॅली सीआरपीएफ ग्राउंडवरून काढण्यात येणार आहे. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीदान समारंभास उपस्थित राहतील. यावेळी राज्यपालांसोबत राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. दीक्षांत समारंभा नंतर हर्ष चव्हाण हे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. दोन्ही कार्यक्रमांना गडचिरोलीचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे हेही सोबत राहतील.
मंगळवारला होणाऱ्या विविध कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सोमवारी दुपारी गडचिरोलीत आगमन होणार आहे. आगमनानंतर ते डॉ. अभय बंग यांच्या चतगाव येथील सर्च या संस्थेस भेट देणार असल्याची माहिती आहे.
राज्यपालांच्या या दौऱ्यात कसलीही त्रुटी राहु नये यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे. एवढेच नव्हेतर खड्डे पडलेले रस्ते चकचकीत करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलकांवर वाहन चालवून आठ जणांना चिरडण्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबर सोमवारला महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचा गडचिरोली आगमनानिमित्त जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.