हा अपघात इतका भीषण होता की त्याचा आवाज लांबवर ऐकू गेला. अपघात होताच स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरु केले आणि बोगीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सध्या गॅस कटरने बोगी कापून अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यात येत आहेत. या अपघाताचे हादरवणारं वर्णन प्रत्यक्षदर्शींनी केलं आहे.
प्रत्यक्षदर्शींची हादरवून सोडणारी माहिती
शेतात काम करत असताना अचानक जोराचा आवाज झाला. काही कळणार तोच लोकांच्या किंकाळ्या कानावर पडल्या. रेल्वे रुळाच्या दिशेने धाव घेतली, तोच समोरच दृश्य पाहून सारेच हादरुन गेले, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. त्यानंतर स्थानिक आणि प्रवाशांनी मिळून मदतकार्याला सुरुवात केली.
तर, याच ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने घडलेला सारा घटनाक्रम सांगितला. सकाळचे ९ वाजले होते. मी थोडा झोपेत होतो, तेवढ्यात ट्रेनला जोरदार धक्का बसला आणि जोराचा आवाज आला. आरडाओरडा सुरू झाला. मी बोगीतून खाली उतरलो आणि मागे पळत सुटलो. तेव्हा गाडीला अपघात झाल्याचं कळालं. काही महिलांच्या कपड्यांवर रक्त होते आणि त्या आरडाओरड करत होत्या. एका महिलेच्या हातात एक लहान मूल होतं, आईला रडताना पाहून ते मूलही रडत होतं. कोणी अडकले आहे की नाही हे पाहण्यासाठी पूर्णपणे चक्काचूर झालेल्या त्या बोगींमध्ये डोकावून पाहू लागलो.
मी वाचलो पण मागच्या बोगीतील… – एक प्रवासी
दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितलं की, ‘मी ट्रेनच्या बी-१ कोचमध्ये बसलेलो होतो. तेवढ्यात जोरदार धक्का बसला आणि माझे डोके बोगीला धडकले. सगळे घाबरले, अनेकांना अश्रू अनावर झाले. मी पण बाहेर येऊन पाहिलं तर मीही घाबरलो. माझ्या बोगीतील सगळे सुरक्षित होते, पण मागच्या बोगीतील लोकांचा मृत्यू झाला होता. मला काहीच समजत नव्हते. काही वेळाने मला माझ्या घरच्यांचा फोन आला, मी त्यांना सांगितले की मी सुरक्षित आहे.
‘समोरील दृश्य पाहून मन सुन्न झालं’
जेव्हा मी समोरच्या बोगीतून बाहेर पडलो आणि मागे आलो तेव्हा मी पाहिलं की एक बोगी दुसऱ्या बोगीवर चढली होती. हे दृश्य इतकं भीषण होतं की पाहून मला धक्काच बसला. बोगीच्या वरची बोगी हवेत होती. लोकांना तिथून लांब राहण्यास सांगण्यात आले जेणेकरून बोगी जर पडली तर इतर कोणाला जीवितहानी होऊ नये. लोक त्या बोगीच्या ढिगाऱ्याखाली आपले प्रियजन शोधत होते. सामानाचा शोध घेत होते. प्रियजनांसाठी त्यांचा आक्रोश हा मन हेलावणारा होता. हे सगळं बघून मन सुन्न झालं होतं, असं एका प्रवाशाने सांगितलं.