आज कंचनजंगा ट्रेनचा अपघात झाला आहे. मालगाडीच्या चालकाने पॅसेंजर ट्रेनला धडक दिली. मालगाडीच्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पॅसेंजर ट्रेनच्या मागील बाजूच्या गार्डच्या डब्याचे मोठे नुकसान झाले असून, पुढील दोन पार्सल व्हॅनच्या डब्यांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती दार्जिलिंग जिल्ह्याच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष जया वर्मा सिन्हा यांनी दिली आहे.
मालगाडीचा चालक आणि कंचनजंगाच्या गार्डचा मृत्यू
बचाव कार्य पूर्ण झाले आहे. मालगाडीच्या चालकाने (लोको पायलट) सिग्नलकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. या अपघातात मालगाडीचा चालक आणि कंचनजंगाच्या गार्डचाही मृत्यू झाला आहे. आगरतळा-सियालदह मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर हेल्प डेस्क उभारण्यात आले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.
या अपघातात प्रथमदर्शनी मानवी चूक झाली आहे, असं दिसून येतं. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच खरी माहिती कळेल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असंही सिन्हा यांनी सांगितलं
मालगाडीची एक्स्प्रेसला जोरदार धडक
सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास रेल्वे रुळावर उभ्या कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने मागून जोरदार धडक दिली. १३१७४ कंचनजंगा एक्स्प्रेस ही आगरतळाहून सियालदहला जात होती, तेव्हा हा अपघात घडला. या धडकेत कंचनजंगा एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. तर एक डबा थेट मालगाडीच्या वर चढला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली, सर्वत्र आरडाओरडा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर इतर प्रवाशी आणि स्थानिकांनी मिळून बचावकार्याला सुरुवात केली. सध्या पोलिस आणि रेल्वे प्रशासन बचावकार्य राबवत आहेत.