बंद मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसेनेचं खुलं आव्हान

हायलाइट्स:

  • महाराष्ट्र बंद संपूर्ण राज्यात यशस्वी होतोय – संजय राऊत
  • बंदला विरोध करणाऱ्या राऊत यांनी सुनावले खडे बोल
  • हिंमत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा – राऊत

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी पुकारलेला महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) हाणून पाडण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज थेट आव्हान दिलं. ‘बंद मोडून काढण्याची भाषा कुणी करत असेल तर ते मूर्ख आहेत. कोणाला रस्त्यावर यावं असं वाटत असेल तर येऊन दाखवावं,’ असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘राज्यात बंद सुरू झालेला आहे आणि आमच्या माहितीनुसार बंद यशस्वी होत आहे. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील या आंदोलनाकडून अपेक्षा आहेत,’ असं राऊत म्हणाले. ‘आमचा बंदला पाठिंबा नाही असं कोणी म्हणत असेल तर आपण देशाचे नागरिक आहोत का? आपण शेतकऱ्यांचं काही देणं लागतंय का हा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारावा,’ असा टोला राऊत यांनी मनसे व भाजपला हाणला. ‘हा बंद मोडून काढण्याची भाषा कुणी करत असतील तर ते मूर्ख आहेत. कोणाला रस्त्यावर यावंसं वाटत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं. लखीमपूरमध्ये मंत्रीपुत्रानं शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासारखी जीप इथं कुणाकडं असेल तर ती रस्त्यावर आणून दाखवावी,’ असं राऊत म्हणाले.

वाचा: शेतकऱ्यांच्या हत्येला मनसेचा पाठिंंबा आहे का?; राष्ट्रवादीचा रोकडा सवाल

‘हा राजकीय बंद नाही. शेतकऱ्यांसाठी केलेला बंद आहे. काही लोकांच्या युनियन असतात. विरोधाचे किडे वळवळत असतात. पण त्यानं काही फरक पडत नाही. शेतकऱ्यानं अन्न पिकवलं नाही तर हे बंद मोडून काढण्याची भाषा करणारे आणि बस रस्त्यावर आणायला सांगणारे उपाशी मरतील,’ असंही राऊत म्हणाले. ‘केंद्रातील सरकारला कोणताही गतिरोधक नाही. त्यामुळंच बेफाम आणि बेबंदपणे ते गरीब, सामान्य आणि शेतकऱ्यांना चिरडत सुटलेत,’ असा संतापही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.

मुंबईत काही ठिकाणी बेस्टच्या बसेसवर दगडफेक झाल्याचं राऊत यांच्या निदर्शनास आणलं असता ते म्हणाले, ‘लखीमपूरच्या घटनेमुळं लोकांच्या मनात संताप आहे. हा संताप समजून घ्यायला हवा.’

वाचा: ‘पोलीसच दुकानं बंद करायला सांगताहेत, ही कुठली पद्धत? हे कुठलं राज्य?’

Source link

maharashtra bandhSanjay RautSanjay Raut Challenges OppositionSanjay Raut Latest News Todayमहाराष्ट्र बंदसंजय राऊत
Comments (0)
Add Comment