लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळी दरम्यान अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधी कुठून लढणार याची उत्सुकता लागली होती. अखेर राहूल गांधी यांनी यावेळी रायबरेली आणि वायनाड या काँग्रेसच्या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली. दोन्ही मतदारसंघात ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. परंतु लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या तरतुदींनुसार दोन मतदार संघांतून उमेदवार विजयी झाल्यास त्याला कोणत्याही एक मतदारसंघातून राजीनामा देणे बंधनकारक असते. त्यामूळे राहूल गांधींना या चोविस तासात याबद्दल लोकसभा अध्यक्षांना आपला निर्णय कळवावा लागेल.
राहुल गांधी काय निर्णय घेणार ?
२०१९ साली देखील राहुल गांधींनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती. परंतु त्यातील अमेठीमधून त्यांचा पराभव झाला होता.दुसरा मतदारसंघ हा केरळमधील वायनाड मतदारसंघ होता. ज्यामूळे राहुल गांधींचा बचाव झाला. परंतु आता झालेल्या निवडणुकांमध्ये ते दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाल्याने कोणत्या मतदारसंघातून राजीनामा द्यावा हा त्यांच्यासमोर पेच होता.याबाबत त्यांनी वायनाड मधील जनतेलाही विचारणा केली होती. यावेळी ते म्हणाले की, ” मी दुविधेमध्ये आहे. प्रश्न हा आहे की मी वायनाडचा खासदार राहू की रायबरेलीचा ? मी पीएम मोदींसारखा ईश्वराने निर्देशित केलेला नाही..मी एक सामान्य माणुस आहे. माझा ईश्वर माझे गरीब लोक आहेत. मला तुमच्याशी बोलायचे आहे आणि पुढे काय करायचे याचा निर्णय घ्यायचा आहे.” यावेळी त्यांनी वायनाडमधील उपस्थितांना प्रश्न विचारला की मी वायनाडचा खासदार राहू की रायबरेलीचा,गर्दीतून एकच आवाज आला..वायनाड. यादरम्यान राहुल गांधी यांनी जनतेला आश्वस्त केले होते की माझ्या निर्णयाने रायबरेली आणि वायनाड दोन्ही मतदारसंघांतील कार्यकर्ते खुश होतील.
याबाबत काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, ते रायबरेली सोडणार नाहीत. याबाबत काँग्रेस पक्षाची एक बैठक आज (१७ जून) रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजीनामा द्यावा लागतो तो नियम काय आहे ?
राहुल गांधींना ज्या नियमांन्वये राजीनामा द्यावा लागत आहे तो नियम लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या अंतर्गत आहे.लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम ६८ (१) नुसार जेव्हा एखादा उमेदवार दोन मतदारसंघांतून विजयी होतो. तेव्हा निकाल जाहीर झाल्यापासून १४ दिवसांत त्यांना त्यांपैकी कोणत्याही एका जागेवरुन राजीनामा देणे बंधनकारक असते. यामध्ये १४ दिवसांची गणना ही निकाल जाहीर झालेल्या दिवसानंतर सुरु होते.
राजीनामा दिला नाही तर काय होते ?
लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार जर दोन जागांवर विजयी झालेल्या उमेदवाराने निकाल घोषित झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांमध्ये दोन्हीपैकी एका जागेचा राजीनामा न दिल्यास त्याची दोन्ही जागांवरील निवड रद्द केली जाते व तिथे पोटनिवडणूक घेतली जाते.
४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला होता. यामध्ये राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघांतून विजयी झाले होते. निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून आज अखेर १३ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे १८ जून ही राजीनाम्याची अंतिम तारीख असेल. राहुल गांधीना राजीनामा देण्यासाठी आता केवळ २४ तास बाकी आहेत. राहुल गांधांनी राजीनामा दिल्यानंतर सहा महिन्यात तिथे पोटनिवडणूक घेतली जाईल.