Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेलीची केली निवड; वायनाड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने केली मोठी घोषणा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अखेर एका मतदारसंघाची निवड केली आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आणि रायबरेलीचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन मतदारसंघातून विजय झालेल्या उमेदवाराला निकालानंतर १४ दिवसाच्या आत कोणत्या तरी एका मतदारसंघातून राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार राहुल गांधी यांची मुदत उद्या संपणार होती. जर त्यांनी हा निर्णय घेतला नसता तर दोन्ही मतदारसंघातील त्यांची निवड रद्द झाली असती.

प्रियांका गांधी लढणार पोटनिवडणूक

राहुल यांनी गांधी कुटुंबाची पारंपारीक मतदारसंघाची निवड केल्यानंतर आता प्रियांका गांधी प्रथमच निवडणुकीच्या रिंगणार उतरणार आहेत. राहुल गांधी यांनी रायबरेलीची निवड केल्यानंतर आता वायनाड येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी मैदानात उतरणार आहेत. गेल्या काही काळापासून प्रियांका गांधी काँग्रेसच्या प्रचारात दिसत होत्या पण त्यांनी कधीच निवडणूक लढवली नव्हती. आता त्या प्रथमच निवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी यांनी २०१९ साली प्रथम वायनाडमधून निवडणू्क लढवली होती. तेव्हा त्यांचा अमेठीतून पराभव झाला होता.


केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांचा यावेळेला ३ लाख ६४ हजार ४२२ मतांनी विजय झाला होता. त्यांना ६ लाख ४७ हजार ४४५ मते मिळाली. तर उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी यांनी भाजपचे उमेदवार दिनेश सिंह यांचा ३ लाख ९० हजार ३० मतांनी पराभव केला होता. रायबरेलीतील मतदारांनी राहुल गांधींना ६ लाख ८७ हजार ६४९ इतके मते दिली. तर दिनेश सिंह यांना फक्त २ लाख ९७ हजार ६१९ मते मिळाली.

रायबरेली मतदारसंघाचे इतकी वर्षी प्रतिनिधित्व राहुल गांधींच्या आई सोनिया गांधी करत होत्या. यावेळी मात्र त्यांनी लोकसभे ऐवजी राज्यसभेतून संसदेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून रायबरेलीत कोण निवडणूक लढवणार याची चर्चा सुरू होती. अखेरच्या क्षणी येथून राहुल गांधींच्या उमेदवारीची घोषणा झाली.

Source link

CongressMallikarjun Khargepriyanka gandhi fight elections from wayanadrahul gandhi will keep the raebareli seatप्रियांका गांधीप्रियांका गांधी वायनाडमधून लढणाररायबरेली लोकसभा मतदारसंघराहुल गांधी रायबरेलीवायनाड लोकसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment