रिपोर्ट्सनुसार, या अज्ञात व्यक्तीने लंडनच्या कायदेशीर फर्म रोसेनब्लाटच्या माध्यमातून आयफोन निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई केली आहे. iMessage च्या कार्यक्षमतेमध्ये वेगवेगळ्या डिव्हाइसेसवरील संदेश हटवण्याबाबत स्पष्टता नसल्याच्या युक्तिवादावर हा खटला केंद्रित आहे. जर, त्याच्या संबंधांबाबत त्याच्या पत्नीला अशाप्रकारे कळालं नसतं तर कदाचित त्याला त्याचं लग्न वाचवण्याची संधी मिळाली असती, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. त्याच्या पत्नीला त्याच्या संबंधांबाबत अत्यंत चुकीच्या पद्धतीने कळाले. जर तो आपल्या पत्नीशी व्यवस्थितपणे बोलू शकला असता तर कदाचित तिला हे इतके चुकीचे वाटले नसते आणि त्यांचा घटस्फोट झाला नसता, असंही तो म्हणाला.
‘मेसेज डिलीट झाल्याचं सांगितलं असेल तर तो डिलीट झालाय असंच समजणार’
या व्यक्तीने टाईम्सला सांगितले की, जर तुम्हाला एखादा मेसेज डिलीट करण्यात आल्याचं सांगण्यात आले, तर तो डिलीट झाला आहे, असे मानण्याचा तुम्हाला अधिकार आहे. जर मेसेजमध्ये असे लिहिले असते की हे मेसेज फक्त या उपकरणातून डिलीट केले गेले आहेत. तरी तुम्हाला एक इशारा नक्कीच मिळाला असता. त्यामुळे केवळ या उपकरणात मेसेज डिलीट करण्यात आला आहे, असे म्हणणे अधिक स्पष्टपणे सूचित करणारं असेल, असंही ते म्हणाले.
घटस्फोटासाठी अॅपल जबाबदार
आपल्या घटस्फोटासाठी Apple जबाबदार असल्याचं सांगत त्याने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, तांत्रिक गैरसमजामुळे अशाप्रकारच्या परिस्थितींना सामोरे जावे लागलेल्या इतर लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सामूहिक खटला दाखल करण्याचा विचार करत आहे. ज्यांना त्यांचा फोन कसा वापरायचा हे माहित नाही अशा इतर पुरुषांकडून त्याला सामूहिक खटला दाखल करायचा आहे, असंही त्याने सांगितलं.