पोलीस अधीक्षक अजित सिंह शेखावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, देसराज यांनी डिसेंबर २०२१ मध्ये पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले होते की, त्यांचा भाचा विनोद हा सुखदेव नगरमध्ये हॉरट्रोन नावाने एक संगणक केंद्र चालवायचा. ५ ऑक्टोबर २०२१ च्या संध्याकाळी विनोद हा परमहंस झोपडीच्या गेटवर बसलेला होता. तेव्हा त्याला एका वाहनाने धडक दिली. या घटनेत विनोदचे दोन्ही पायांना मोठी दुखापत झाली. यानंतर आरोपी चालकाविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी देव सुनार उर्फ दीपकला अटक केली.
घरात घुसून विनोदवर गोळ्या झाडल्या
घटनेच्या १५ दिवसांनी देव सुनार हा विनोदकडे तडजोडीसाठी आला होता, मात्र विनोदने नकार दिला. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देऊन देव निघून गेला. यानंतर १५ डिसेंबर २०२१ ला देव सुनार हा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन सुमितच्या घरात घुसरा, विनोदच्या खोलीत गेला आणि आतून दार लावून घेतलं, हे पाहून विनोदच्या पत्नीने आरडाओरड केली. आवाज ऐकून देसराज आणि त्यांच मुलगा यश हे विनोदच्या घरी पोहोचले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण, तो उघडला नाही. त्यांनी खिडकीतून पाहिले तेव्हा देव सुनारने विनोदला पलंगावरून खाली पाडलं आणि त्याच्या कंबरेवर आणि डोक्यात गोळ्या झाडल्या. सर्वांनी मिळून आरोपी देव सुनारला घटनास्थळीच पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच, विनोदला रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
विनोदच्या भावाचा संशय अन् बिंग फुटलं
आरोपी देव सुनार पानिपत तुरुंगात आहे. न्यायालयात चालान सादर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना मृत विनोद यांच्या भावाचा ऑस्ट्रेलियातून व्हॉट्सॲप मेसेज आला होता. या हत्येत अन्य लोकांचा सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली आणि सीआयए तीनचे प्रभारी निरीक्षक दीपक कुमार यांना सूचना देऊन तपासाची जबाबदारी सोपवली. पोलिसांनी पुन्हा मृत विनोदची फाईल उघडली आणि तपास सुरू केला.
तपासादरम्यान आरोपी देव सुनार याची सुमित नावाच्या तरुणाशी ओळख असल्याचे समोर आले. तसेच, सुमितचे विनोदची पत्नी निधी हिच्याशी संपर्क असल्याचे पुरावे मिळाले. त्यानंतर पोलिसांनी सुमितला ताब्यात घेतलं. चौकशीत सुमितने सांगितले की, त्याने आणि निधीने देवला विनोदच्या हत्येची सुपारी दिली होती. अपघातात तो वाचला तेव्हा विनोदला गोळ्या घालून मारण्यात आले.
जिममध्ये सुमित आणि निधीची ओळख
जिममध्ये निधी आणि सुमितची ओळख झाली आहे. सुमित जिम ट्रेनर होता. त्यांच्यातील संबंधांबाबत विनोदला माहिती झाली आणि त्याचं सुमितसोबत भांडणही झालं. निधी आणि विनोदमध्येही वाद झाला. त्यावंतर सुमित आणि निधीने विनोदला संपवण्याचा कट रचला.
त्यासाठी देवला १० लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. अपघातात विनोद वाचला आणि देवला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर निधी आणि सुमितने देवची जामीन केली आणि त्याला पुन्हा विनोदची हत्या करण्यास सांगितलं. आणखी पैशांचं आमिष दाखवल्यानंतर देवने विनोदच्या घरात घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. देव तुरुंगात गेल्यानंतर सुमित त्याच्या घरचा पूर्ण खर्च उचलायचा. यांच्या योजनेनुसार निधीने मार्च २०२४ मध्ये न्यायालयात आपली साक्ष मागे घेतली. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी या घटनेचा पुन्हा एकदा तपास केला तेव्हा त्यांना याप्रकरणाची धक्कादायक माहिती कळाली आणि त्यांनी सुमित आणि निधीला अटक केली.